झी युवा “शौर्य – गाथा अभिमानाची”
कथा पोलिसांच्या निर्भयतेची, हुशारीची आणि कर्तव्यदक्षतेची
असं म्हणतात कि, गुन्हा घडणं हे अनादिकालापासून चालू आहे किंबहुना माणूस जमात जेवढी जुनी आहे तेवढाच गुन्हा सुद्धा जुना असू शकेल आणि जसजसा माणूस बदलला तसंतसं गुन्ह्यांचं स्वरूप बदललं आणि त्याच प्रमाणे पोलिसांना सुद्धा त्यांच्या शोधकार्याच्या पद्धती बदलाव्या लागल्या. काहीही झालं तरी गुन्हेगाराने मोकाट फिरू नये, ह्या गोष्टींची दक्षता पोलीस घेत आले आहेत. पोलिसांची शौर्य गाथा हि कायम त्यांच्या धाडसाची प्रचिती देणारीच असते.
कधी शक्ती श्रेष्ठ असते तर कधी शक्ती पेक्षा युक्ती. या आठवड्यात येणारे दोन्हीही भाग, हे महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि युक्तीचे प्रदर्शन करेल. येत्या आठवड्यात येणारी पहिली कथा आहे उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांची, त्यांनी निर्भयतेने राम आणि शाम या रायगड पट्ट्यातील अट्टल खुनी आणि दरोडेखोरांना कसे कंठस्नान घातले याची. रायगड पट्ट्यात जवळ जवळ ६००० पोलीस ,२२ वर्षे त्यांचा शोध घेत होते आणि दुसरी गोष्ट आहे पोलीस अधिकारी भोसले यांच्या जिद्दीची कर्तव्यदक्षतेची, त्यांनी कश्या प्रकारे त्यांना मिळालेल्या एका छोट्याशा माहितीवरून, मुंबईतील प्रसिद्ध व्यवसायिक दवे यांच्या मुलाच्या अपहरणकर्त्यांना हुशारीने पकडले याची. ह्या दोन्ही कथा आपल्याला झी युवावर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येतील.
राम आणि शाम हे दोन्ही अट्टल खुनी दरोडेखोर वर्षोनवर्षे रायगड पट्ट्यात अनेकांचे मुडदे पाडत दहशत पसरवली होती. धनाढ्यच नाही तर गरीब आदिवासीना सुद्धा ते धमकावयचे. खंडणीसाठी ते कोणाही ठार मारायचे मग बाई पुरुष हे काहीही बघायचे नाहीत. त्यांचा एवढा दरारा झाला होता कि पोलिसवाले सुद्धा घाबरत होते. सुरेश खोपडे यांची रायगड जिल्ह्यात उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये सुरेश खोपडे यांनी केस निकाली काढली. पण त्यांचा हा लढा एवढा सोपा नव्हता. महिनोंमहिने आदिवाशींच्या मदतीने पाठ काढत, व्यवस्थित जाळं रचून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि नंतर अतिशय निर्भयपणे त्यांनी राम आणि शाम या जोडगोळीला कसे कंठस्थान घातले याची चित्तरकथा शुक्रवारी रात्री ९ च्या या भागात आपल्याला झी युवावर पाहायला मिळेल.
दुसऱ्या कथेत आपल्याला पोलीस अधिकारी भोसले यांनी मुंबईमधील प्रसिद्ध व्यवसायिक दवे यांचा मुलगा किरण दवे अपहरण केस कशी जिद्दीने सोडवली हे समजेल. किरण दवे अपहरण केस पोलिसांसाठी एक `प्रतिष्ठेची केस बनलेली होती. आधीच बिल्डर लॉबी वेगवेगळ्या गँग्स कडून येणाऱ्या धमक्यांमुळे हैराण होती आणि दवेंच्या मुलाला किडनॅप होऊन बराच काळ लोटला होता पण किडनॅपर पोलिसांच्या हातातून सारखेच निसटत होते. शेवटी किडनॅपरची मागणी मान्य करून दवे यांनी त्याच्या मुलाला सोडवले पण त्यामुळे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे निघाली.
एका कर्तव्यनिष्ठ इमानदार पोलीस अधिकाऱ्याच्या अक्कल हुशारी आणि मुख्य म्हणजे त्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणजेच हि कथा आहे. कश्याप्रकारे भोसले एका छोट्याशा पुराव्यावर अपहरणकर्त्या पर्यंत पोहोचले आणि पोलिसांच्या गौरवाची शान राखली हे आपल्याला शनिवारच्या ९ च्या या भागात आपल्याला पहायला मिळेल.
या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.