मित्रांनो!, तुम्हाला आठवत असेलच अन कदाचित तुम्ही या गाण्यावर आपल्या आप्तस्वकीयांच्या मंगलकार्यात बेभान होऊन डान्स केलाच असेल. शांताबाई… हेच ते गाणं! जे काही वर्षांपूर्वी खूप हिट ठरलं होतं लोककलावंत संजय लोंढे यांनी हे गाणं लिहिलं होतं. नुकतेच संजय लोंढे यांच्यावर आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली असल्याचे समोर आले आहे.

गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोककलावंत घरीच बसून आहेत हाताला कुठलेच काम नाही की कुठला कार्यक्रम नाही यामुळे बहुतेक कलाकार परिस्थितीपुढे हतबल झाली आहेत. हातात असलेला पैसाही खर्च झाल्याने आता काय खावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

“मला काहीतरी मदत करा. खूप अडचणीत आहे. माझा सख्खा मोठा भाऊ वारला आहे. आणि घरात मुले उपाशी आहेत खिशात एक रुपया पण नाही. घरातील सिलेंडर संपलाय. माझे शो बंद आहेत, रेकॉर्डिंग बंद आहे काय करावं सुचेना ” संजय लोंढे यांचा हा मेसेज त्यांचा परिस्थीती ची जाणिव करुन देतोय. लोककलावंत असणाऱ्या लोंढेनचं शांताबाई हे गाणं प्रसिद्ध झालं आणि त्यांचे दिवस पालटले. नवीन गाणी रेकॉर्डिंग ची संधी मिळायला लागली.

पण लॉकडाऊन लागला आणि हे सगळंच थांबलं. साठलेल्या पैशातून पाहिले काही दिवस कसेबसे काढले. पण काम थांबलं आणि अडचणी वाढत गेल्या. वर्षभरात परिस्थीती अगदीच खालावली. ,” एकही स्टुडिओ सुरू नाहीये. रेकॉर्डिंग पूर्ण बंद आहे. मध्यंतरी एखादं काम मिळालं तरी पोलीस रेकॉर्डिंग बंद करायचे. त्यामुळे उत्पन्न पूर्ण थांबले”. लोंढे सांगत होते.

लोककलावंतांची हीच परिस्थिती सांगणारं एक गाणं पण मध्यंतरी लोंढे यांनी तयार केलं. पण आपली परिस्थीती आणखी खलावेल याचा लोंढेना अंदाज नव्हता. संकट आली ती पण एका पाठोपाठ एक. एकीकडे उत्पन्न नाही त्यातच मोठा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह झाला. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

” भावाचे अंत्यसंस्कार करायला पण माझा कडे पैसे नव्हते. शेवटी रुग्णालयाच्याच मदतीने अंत्यसंस्कार केले. पण नंतर दिवसकार्य इ. काहीच करता आलं नाही” लोंढे सांगत होते. आता तर अगदी त्यांचा घरातला सिलेंडर देखील संपला आहे. सकाळ पासून ७ जणांचं त्यांचं कुटुंब उपाशी आहे. लोंढे आता वाट बघत आहेत ती मदतीची.

ह्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी देखील अशाच प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले होते. २०२० मध्ये साधारण एप्रिल महिन्यात पुण्यातील काही ठिकाणी गरीब, बेघर मजुरांना अन्नधान्याचे वाटप सुरू केले होते. मंगळवार पेठेतील राजेवाडी येथील झोपडपट्टी भागात धान्याचे वितरण केले जात होते.

तेथे या भागातील गरजू लोककलावंतांमध्ये गायक, ढोलकीपटू आणि विविध वाद्यवादक यांचाही समावेश होता. त्यांना सोशल डिस्टन्स राखत धान्याचे वाटप करण्यात आले होते . त्यावेळी ‘शांताबाई’ फेम गायक- संगीतकार संजय लोंढे हे सुद्धा या रांगेत उभे होते. आणि आताही काम नसल्याने तीच परिस्थिती त्यांच्यावर पुन्हा एकदा ओढवलेली दिसून येत आहे.