विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले या शब्दात महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यासाठी आपली जीवनसोबती सावित्रीबाई फुले यांसोबत त्यांनी आपले अखंड आयुष्य वेचले. शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या फुले दाम्पत्यांची हि यशोगाथा ‘सावित्रीजोती’ या चरित्रपटातून प्रेक्षकांसमोर सोनी मराठीवर सादर झाली आहे. दशमी क्रिएशन निर्मित ह्या चरित्रपटाद्वारे फुले दाम्पत्यांचे सहजीवन आणि जातीपातींच्या पलीकडे जाऊन समाजासाठी त्यांनी केलेले नि:स्वार्थी काम दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सोनी मराठी वर प्रदर्शित होत असलेल्या या चरित्रपटामध्ये जोतिराव आणि सावित्री यांचे बालपण दाखवले जात आहे. नुकताच या दोघांचा महापरिवर्तक विवाह सोहळा संपन्न झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे. इ.स. १८४० साली जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. त्यामुळे, चरित्रपटात समर्थ पाटील या बालकलाकाराने ज्योतीबा फुले ह्यांची तर तृष्निका शिंदेने सावित्री बाई ह्यांची बालपणाची भूमिका साकारली आहे.
फुले दाम्पत्याचा हा विवाहसोहळा समाजपरिवर्तनासाठी ऐतिहासिकच म्हणावा लागेल ! तत्कालीन संस्कृती आणि रूढी परंपरांच्या कचाट्यात सापडलेल्या त्याकाळच्या अशीक्षीत वर्गाची दशा आणि दुर्दशा या चरित्रपटाद्वारे प्रेक्षकांना जवळून अनुभवता येत आहे. स्त्री शिक्षणाची पाळेमुळे रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या मूळ व्यक्तिरेखेत अश्विनी कासार हि गुणी अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार असून, ओंकार गोवर्धन ज्योतिराव फुलेंच्या भूमिकेत दिसेल.
‘तो काळ प्रेक्षकांसमोर जिवंतपणे उभा करणे आव्हान आहे. त्यामुळे विविध तंत्रांच्या साहाय्याने त्या काळातील जीवन, फुल्यांचे घर, तत्कालीन सामाजिक परिस्थिती अशा अनेक घटकांशी साधर्म्य साधण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहे. यानिमित्ताने सावित्री आणि जोतिबांचे कार्य घराघरात पोहचवले जाईल,’ असे मालिकेचे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले.