मित्रांनो! जुन्या काळातील म्हणी या काळाच्या कठोर कसोटीवर घासून, तावून-सुलाखून सिद्ध झालेल्या असतात… जसे “बोलणाऱ्याची माती विकते पण न बोलणाऱ्याचे सोने विकत नाही.” कोणत्याही बिझनेस मध्ये सेल्स आणि मार्केटिंगला असणारे महत्व लक्षात घेता हे आपल्या सहज लक्षात येते.
मित्रांनो!, संभाषण करणे, संवाद साधणे ही एक कला आहे आणि आपल्या याच कलेला थोडा विनोदाचा टच देत उत्तम प्रतीच्या मालासोबत आपुलकी अन आस्थेवाईकपणे जर ग्राहकांना तत्पर, विनम्र आणि सस्मित सेवा दिली तर काय चमत्कार होऊ शकतो? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले एक चाचा. ह्या चाचांच नाव आहे अन्सार चाचा.
त्यांचं समनापूर येथे वडापावचं दुकान आहे “नशीब वडापाव”. नशिबमध्ये मिळणाऱ्या वडापावच्या चवीची जशी चर्चा असते तशीच चर्चा या अन्सार चाचांच्या मधाळ बोलीची ही असते. गेल्या काही काळात तर सोशल मीडियावर या अन्सार चाचांच्या वडापावच्या दुकानावरील जबरदस्त कॉमेंट्रीचे अनेक व्हिडियोज तुफान वायरल झाले आहेत. एक से एक डायलॉग म्हणत, मायबाप ग्राहकांचे मनोरंजन करत अन्सार चाचा अशी करमणूकयुक्त ग्राहकसेवा देतात की, एकदा आलेला ग्राहक त्यांचा नेहमीचा ग्राहक बनून जातो.
नशीब वडापावच्या दुकानावर गर्दी खूप असते. असं असलं तरीही यांच्यातील प्रत्येकाला अन्सार चाचां मायबाप म्हणून संबोधतात. तसेच प्रत्येकाशी अगदी अदबीने पेश येतात. अर्थात कधी कोणी नियमांचं उल्लंघन केलं की त्यांचा कठोर स्वर ऐकू येतो, पण तोही अगदी काही क्षण. पुन्हा त्यांच्या गोड वाणीत त्यांचं बोलणं चालू असतं. त्यांच्या उजव्या हाताला असलेला मुलगा, वडा पाव बांधत असतो तर डाव्या बाजूला वडे आणि मिरच्या तळण्याचा कार्यक्रम सुरू असतो. पण आपलं लक्ष मात्र वन अँड ओन्ली अन्सार चाचांच्या बोलण्याकडे असतं.
त्यांच्या डाव्या बाजूला लेडीज साठी विशेष जागा असते जेणेकरून त्यांना वडापाव व्यवस्थित घेता यावा. पण त्यातही कोणत्या ताई, माईला, अक्काला वडापाव मिळण्यास विलंब लागला तर आपल्या माणसाला ते म्हणतात, “अरे अक्का वाट बघून राहिली काही महिने, पाहिले त्यांना वडापाव बांधून दे.” ग्राहकांना मिरच्या देताना, “चटक्याला समुद्राचा झटका देऊन टाक” असं म्हणत ते आपल्या माणसांना मिरच्या तळायला सांगतात.
वडापाव आता खायला हवा आहे की पार्सल हे विचारताना ‘नेता की खाता’ असा प्रश्न विचारतात. बरं ते या टोन मध्ये विचारतात की उत्तर पण खाता किंवा नेता असंच येतं. त्यातून एक वेगळीच गंमत निर्माण होते. जेव्हा वडापाव फास्ट बनवून हवे असतात त्यावेळी आपल्या कारागिराला “महाप्रचंड वेग धारण कर” म्हणून अन्सार चाचां ऑर्डर देतात. चाचा आणि त्यांचे एकापेक्षा एक डायलॉग्ज उगीच प्रसिद्ध होत नाहीत. त्यांच्या या सुप्रसिद्ध डायलॉग्जचं आणि खेळकर वृत्तीचं कारण विचारलं असता, आजवरचा अनुभव आणि मायबाप ग्राहकांनीच हे सगळं शिकवलंय, असं ते सांगतात.
त्यांनी मागे एकदा एका युट्युब चॅनेल ला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी स्वतःचा प्रवास सांगितला होता. चाचांना परिस्थितीमुळे अगदी लहान वयात हॉटेल मध्ये काम करणं भाग पडलं. पुढे त्यांनी बरीच छोटीमोठी कामं करून आपली परिस्थिती सुधारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यातीलच एक यशस्वी ठरलेला प्रयत्न म्हणजे ही “नशीब वडापावची” गाडी.
१९७८ साली चाचांनी ही गाडी लावायला सुरुवात केली. फक्त ३० पैशाला तेव्हा वडापाव होता. तेंव्हापासून अथक परिश्रम करत करत आज चाचांनी ह्या वडापावच्या गाडीला उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता तर युट्युबवर महाप्रचंड वेगाने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्यांची कीर्ती खरोखर वर्डफेमस झालीय.
अन्सार चाचांच्या अनुभवी वागण्या-बोलण्यातून यशस्वी बिझनेसचे अनेक फंडे शिकता येतात. ग्राहकांशी बोलतांना डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवत कसं संभाषण करावं, बोलताना शब्दांचा ठसका असला तरीही मिठ्ठास कशी असावी, दुकान चालवताना गर्दीचं नियोजन कसं करावं, आणि मुख्य म्हणजे करत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्यांना कसं हाताळावं या आणि अशा अनेक गोष्टी शिकता येतात. आपणही कधी समनापूर मार्गे नाशिकला जाणार असलात तर या अन्सार चाचांच्या नशीब वडापावला मुद्दाम भेट द्या.