कधी शिक्षिका.. कधी पायलट तर कधी सोशल सर्व्हिसेस.. प्रत्येक लहान मुलाला तू मोठेपणी काय होणार विचारले असता, साधारण अशीच उत्तरे ऐकू येतात. लहानग्यांच्या भावविश्वात सातत्याने डोकावणारी ही उत्सुकता त्यांना सगळ्या क्षेत्रात विहार करायला शिकवते पण हे शक्य आहे का.. तर हो.. अभिनय हे एक असं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला प्रत्येकवेळी ननवीन भूमिकांमध्ये रममाण होता येतं. नेमकी हीच गोष्ट लहानग्या रसिका चव्हाणला आकर्षित करत होती. रसिकाने मराठी मनोरंजनक्षेत्रात पाय ठेवलं… इथल्या खाचखळग्यांची बाराखडी शिकली आणि आपल्या अव्व्ल अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अनेक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेले ‘ख्वाडा’ आणि ‘दशक्रिया’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या बावन्नकशी अभिनयाची सुरुवात करणारी रसिका पदार्पणातच रसिक-प्रेक्षकांना भावली. ‘ख्वाडा’ मधली नुकतीच वयात आलेली लाजाळू ‘सोनू’ तर ‘दशक्रिया’ मध्ये अबोल पण जबाबदारीची जाण असणारी शारदा साकारताना रसिका आपल्या अभिनयाचा कस लावू पाहत होती.
तिच्या प्रयत्नांना यश ही मिळालं असून रसिकाने सध्याच्या घडीला तीन चित्रपट पटकावले आहेत. ‘वाय’, ‘कौसा’ आणि ‘खिचिक’ या तिन्ही चित्रपटांमधून रसिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज असून येत्या २० सप्टेंबरला ‘खिचिक’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘खिचिक’ मध्ये रसिक एका ३/४ वर्षाच्या लहानग्याच्या आईची भूमिका साकारत असून या चित्रपटाच्यानिमित्ताने साऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहणारी ही व्यक्तिरेखा साकारणं रसिकाला प्रचंड कठीण गेलं असल्याचं ती सांगते.
बी.एस.सी आय.टी असणारी रसिका चव्हाण शिक्षणाच्याबाबतीत अतिशय काटेकोर आहे. छंद आणि शिक्षणाचा समतोल राखणारी रसिका एमबीए करुन शास्त्रीय संगीताच्या दोन आणि सुगम संगीताची एक परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण झाली आहे. रसिकाला नृत्याची देखील आवड असून आत्तापर्यंत तिने कथ्थक नृत्याच्या ४ परीक्षा दिल्या आहेत. चित्रपट, नाटक आणि सूत्रसंचालन अशा तिन्ही क्षेत्रात मुशाफिरी करणारी ही रसिकप्रिय रसिका प्रेक्षकांसमोर आपल्या अभिनयाच्या जोरावर उत्तम उत्तम कलाकृती घेऊन येईल यात काही शंका नाही.