दीप्ती भागवत ( गजर कीर्तनाचा – झी टॉकीज )
स्वातंत्र्य दिवस-
शाळेतल्या , कॉलेज मधल्या अनेक आठवणी आहेत …. राष्ट्रगीत , वंदे मातरम , देशभक्तीपर गीत म्हणायचे आणि ध्वजावंदन तसेच परेड मध्येही अनेकदा सहभागी झाले आहे….
देशाच्या बाबतीत जात , धर्म ,पंथ यापलीकडे आपण भारतीय आहोत आणि भारतीयत्व आपला खरा धर्म आहे हे आपण ओळखलं पाहिजे … शेतकरी आणि सैनिकांबद्दलची कृतज्ञता सदैव बाळगायला हवी… आतंकवादाची कीड नष्ट करण्यासाठी आपण प्रशासनासोबत कायम उभं राहायला हवं
रक्षा बंधन-
माझ्या सख्या भावाला रघुनंदन बर्वे ह्याला एका रक्षाबंधनाच्या वेळी मी साखर भात खाऊ घातला होता जो भात वाजवीपेक्षा जास्त गोड झाला होता … आग्रह करकरून त्याला खाऊ घातला …. आणि त्याने तो माझ्या प्रेमापोटी खाल्ला … त्याचा केविलवाणा चेहरा आजही आठवतोय … आणि लहान असताना दादाला आकाराने मोठ्या स्पंजच्या राख्यांची आवड होती … मी सगळ्यात मोठी राखी दादाला बांधत असे… आणि हातभार बांधलेल्या अनेक राख्यात … ही दिप्तीची अर्थात त्याच्या सख्या बहिणीची राखी आहे असं दादाला सांगायला लावत असे
ह्या वर्षी रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा ही दिवस आला आहे … आपल्या देशबांधवांच्या प्रति आपलं प्रेम आणि आदराची भावना दृढ करूया आणि आपुलकीच्या धाग्याने हे नातं घट्ट करूया
ह्या वर्षी माझ्या मामाची तब्येत बरी नसल्याने घरातील वातावरण वेगळं आहे … तो लवकरात लवकर बरा व्हावा ही पांडुरंगाचरणी प्रार्थना … ह्या वर्षी मी गजर कीर्तनाचा शूट मधून वेळ काढून त्यांच्यासाठी पुरणपोळ्या करणार आहे… माझी नणंद ,दिर ही घरी येणार आहेत
रक्षाबंधनाला साक्षी ठेवत पूरग्रस्त बांधवांना मी मदत करायची ठरवली आहे
कार्तिकी गायकवाड ( गजर कीर्तनाचा – झी टॉकीज )
स्वातंत्र्य दिवस-
स्वातंत्र्यदिन म्हणजे, सकाळी लवकर उठून, शाळेचा स्वच्छ गणवेश घालून, झेंडावंदनासाठी वेळेवर शाळेत जाणे, हे ठरलेले असते. शाळेत असताना, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, राष्ट्रगीत, ध्वजगीत व इतर गाणी म्हणण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. प्रत्येक वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची ही माझ्यासाठी एक फार मोठी आठवण आहे. लहानपणापासूनच, आपले शिक्षक, आईवडील व इतर वडीलधारी माणसं, आपल्यावर देशप्रेमाचे संस्कार करत असतात. लहानपणी मनावर बिंबवली गेलेली ही देशप्रेमाची भावना कालानुरूप प्रबळ होत जाते. शाळेत, १५ ऑगस्टला देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणे, शिक्षकांकडून मिळणारी देशप्रेमाची भावना, या सगळ्याच आठवणी खूपच खास आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
रक्षा बंधन-
कौस्तुभ आणि कैवल्य असे दोन भाऊ मला असल्याने माझ्यासाठी रक्षाबंधन हा सण खूपच खास आहे. दोन-दोन गिफ्ट्स यादिवशी मला मिळतात, हे सुद्धा त्याचे एक कारण आहे. अर्थात, रक्षाबंधनाचा सुरुवात आमच्या घरात होते, ती माऊलींच्या दर्शनापासून! सकाळी उठल्यावर, मी विठूमाऊलींच्या मंदिरात जाते व त्यांना राखी बांधते. घरी आल्यावर, दोन्ही भावांना ओवाळून त्यांना राखी बांधते. भावाच्या उज्वल भविष्यासाठी बहिणीने प्रार्थना करणे, बहिणीचे रक्षण करण्याचे वचन भावाने तिला देणे, या परंपरा आपल्याकडे चालत आल्या आहेत. भावाबहिणींचे मजामस्तीचे नाते अधिक घट्ट करणारा हा सण मला खूपच आवडतो.
भावांसोबतच्या आठवणी सांगायच्या झाल्या, तर अगदी रोजच्या आयुष्यातील काही ना काही गोष्टी सांगता येतील. आम्ही भावंडं खूप भांडतो, मस्ती करतो, याचा आईबाबांना सुद्धा कधी कधी त्रास होतो. मी मोठी असल्याने सगळ्यात जास्त ओरडा मी खात असले, तरीही खोड्या मात्र हे दोघेही खूप करत असतात. यामुळे रोजच एखादी नवी आठवण या यादीत समाविष्ट होते.
तरीही, एखादी खास आठवण सांगायची झाली तर, ती तानपुऱ्याची सांगता येईल. घरात दोन तानपुरे आहेत, पण बाबा कार्यक्रमासाठी जर तानपुरा घेऊन गेले, तर रियाजाला आधी कुणी बसायचं, या गोष्टीवरून सुद्धा आमच्यात भांडणं होतात. एका रक्षाबंधनाच्या दिवशी कौस्तुभने मुद्दाम याच विषयावरून माझ्याशी भांडण केलं. हे भांडण वाढल्यावर मी त्याच्यावर रागावले. त्याने शांतपणे एक तंबोरा काढून माझ्या हातात ठेवला. अशा निराळ्या पद्धतीने त्याने मला रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं.
कैवल्य आमच्या घरातील शेंडेफळ आहे. पण, लहानपणापासूनच तो अत्यंत अध्यात्मिक आहे. त्यामुळे अनेकदा हा आमच्यापेक्षा लहान आहे की मोठा, असा प्रश्न आम्हाला पडतो. माझ्या या दोन्ही गोड भावांना सुखसमृद्धीचे आयुष्य लाभो अशी प्रार्थना मी माऊलींच्या चरणी करते.