महिला दिन म्हटलं की, विविध उपक्रम, चर्चासत्र, सक्षमीकरणाचे धडे हे सारे आलेच. महिला दिन आला की नारीशक्तीचा एक वेगळाच जागर सर्वत्र अनुभवायला मिळतो. बऱ्याच चित्रपटातूनही महिला सक्षमीकरणाचे किंवा समाजातील महिलांचे अधोरेखित करणारे स्थान याबद्दल विस्तृत वर्णन करणारे बरेच चित्रपट स्त्रियांना एका वेगळ्या विचारापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. अशाच एका आगळ्या वेगळ्या पठडीतील महिला स्वातंत्र्याची जाणीव करून देणारा पुणे टॉकीज प्रस्तुत ‘निर्मल : एनरुट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे आणि महिला दिनाचे औचित्य साधत या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. महिला दिनी प्रत्येक महिलेला शुभेच्छा स्वरूपात भेट दिलेला हा चित्रपट तर नक्कीच आवडेल शिवाय पहिले पोस्टर प्रदर्शित करण्याची ही संधी संपूर्ण चित्रपटाच्या टीमकरिता अविस्मरणीय असेल.
अभिनयाची बाजू सांभाळत दिग्दर्शनाची धुरा सांभाळणारे अभिनेते ऋषी देशपांडे यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. त्यांच्या अभिनयाला आणि दिग्दर्शनाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. ‘थांग’, ‘समांतर’, ‘धूसर’, ‘वक्रतुंड महाकाय:, ‘धनक’ यासारखे चित्रपट असो किंवा सिटी ऑफ ड्रीम्स, लिटिल थिंग्स- 3 सारख्या वेबसिरीज त्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी ‘जिंकी रे जिंकी’ सारख्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच भावविश्व टिपणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करून एका उत्तम दिग्दर्शनाची धुराही उत्तमरित्या पेलली. त्यांच्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाचे कौतुक प्रेक्षकांकडून वारंवार होतच होते. हेच प्रेक्षकांचे प्रेम मिळत रहावे म्हणून ते पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या दिग्दर्शनातून सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. महिलांचे हित आणि स्वातंत्र्य याची उत्तम गुंफण असलेला, आपल्या माऊलीपासून विभक्त असल्याची खंत मनाला सतावत असताना माऊलीच्या भेटीसाठी घडलेला प्रवास आणि संबंध जगलेल्या आयुष्यातील उतार चढाव याची उत्तम मांडणी दिग्दर्शक ऋषी देशपांडे अमेय चव्हाण यांच्या कॅमेरा द्वारे चित्रपटात रेखाटली आहे.
या चित्रपटाने कोलकता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कॅनडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, फेस्टिजिअस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल लॉस अँजेलेस, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दिल्ली, लॉस अँजेलेस इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल येथे आपल्या मानाचा तुरा रोवत चित्रपटाने बरेच अवॉर्डस मिळवले आहेत.
श्री. जगन्नाथ सुरपुरे, ग्लोबल सेवा आणि श्री. ऋषी देशपांडे, आद्योत फिम्स निर्मित आणि ऋषी देशपांडे दिग्दर्शित हे आगळे वेगळे कथानक सुमित तांबे लिखित आहे. या चित्रपटाला संगीत निहार शेंबेकर याने दिले आहे. चित्रपटात झळकणाऱ्या कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. मात्र या चित्रपटाची कथा, संगीत कशा प्रकारचे आहे आणि कलाकार नेमके कोण आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच वाढेल.