कौशल्य प्रशिक्षण योजनेमुळे नासिरला मिळाला रोजगार नासीरला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणारी कौशल्य प्रशिक्षण योजना
आर्थिक दृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीमुळे इच्छा आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देऊ शकत नाहीत. पण त्याला योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो आर्थिक प्राप्ती करून त्याच्या कुटुंबास हातभार लावू शकतो. अमरावतीच्या नासीरला असेच योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तो आता कमी वयात आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊन कुटुंबास हातभार लावतोय, त्याची हि कहाणी.
नासीर हा अमरावती शहरातील अल हिलाल कॉलनीतील रहिवाशी आहे. त्याचे वडील एका शाळेत कर्मचारी आहेत. घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळे त्याला जेमतेम दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले. त्यानंतर कौटुंबिक जबाबदारी असल्याने तो काही लहानसहान कामे करू लागला.
बावीस वर्षांच्या नासीरच्या मनात नोकरी मिळविण्यापेक्षा स्वयंरोजगार करण्याचे होते. त्याला वीज दुरुस्तीच्या कामाविषयी माहिती होती. त्यामुळे हाच व्यवसाय निवडण्याचा निश्चय त्याने केला. मात्र, अशा व्यवसायात जुजबी ज्ञान उपयोगाचे नाही. त्यासाठी तंत्रशुद्ध ज्ञान मिळविणे आवश्यक होते. तसे प्रशिक्षण देणा-या संस्थांची फी देणे त्याला परवडणारे नव्हते.
दरम्यान, नासिरने शासनाकडून कौशल्य विकास सोसायटीतर्फे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात असल्याची आकाशवाणीवर ऐकली आणि त्याने या योजनेसाठी अर्ज केला. त्याचा अर्ज तत्काळ मंजूर झाला आणि ‘इलेक्ट्रिकल वाईंडर’ या कोर्ससाठी तो अमरावतीतील स्नेहदीप व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालयात दाखल झाला. ३ महिन्यांचा कोर्स नासिरने उत्तमरीत्या पूर्ण केला. वीज दुरुस्तीतले तंत्र, धोके व आवश्यक सुरक्षितता याबाबत त्याला परिपूर्ण प्रशिक्षण मिळाले.
प्रशिक्षण संपवून त्याने स्वतः काम करत केवळ दोन आठवड्यात सर्व प्रकारच्या वीज उपकरणाच्या दुरुस्तीसाठी होम सर्व्हिस देणे सुरू केले. त्याची कामातील अचूकता, विश्वासार्हता, मेहनत व ग्राहकांना तत्काळ प्रतिसाद देण्याचा गुण यामुळे तो परिसरात एक यशस्वी इलेक्ट्रिशियन बनला. आज नासीर दर महिन्याला सुमारे पंधरा हजार रूपये कमावतोय.
“मला या प्रशिक्षणामुळे इलेक्ट्रिक फिटिंग, वाईंडिग, विविध उपकरणांची दुरुस्ती ही सगळी कामे करता येतात. हे कौशल्य मिळाल्यामुळे मला स्वयंरोजगार प्राप्त झाला. स्वयंरोजगार करू इच्छिणा-या तरूण मित्रांना मी या प्रशिक्षणाबाबत माहिती देत असतो व स्वयंरोजगार करू इच्छिणा-या युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे”, असे नासिरने सांगितले.