मित्रांनो!, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा परदेशात राहत असली तरीही भारत आणि इथल्या खाद्यपदार्थांबद्दलचं तिचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. म्हणूनच की काय तिनं आता न्यूयॉर्क येथे भारतीय पद्धतीचं रेस्तराँ सुरू केलं आहे. प्रियांकाच्या या रेस्तराँमध्ये अनेक भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल आहे.

अगदी दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतामध्ये मिळणारे अनेक पदार्थ प्रियांकाच्या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये आहेत. ज्यात दही-कचोरी, कोफ्ता-कोरमा, कुल्चा, फिश करी, बटर चिकन, डोसा, भज्जी, गाजरचा हलवा अशा अनेक भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी सर्वांची आवडती पाणीपुरी सुद्धा मिळणार आहे.

“वोग” मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या रेस्टॉरंटचे शेफ हरी नायक यांनी या रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये गाजराच्या हलव्याचा समावेश असावा हे आमचं अगोदरच ठरलं होतं. तर प्रियांकानं यात पाणीपुरीचा सुद्धा समावेश करण्याचं सुचवलं होतं असा खुलासा केला. ते म्हणाले, ‘प्रियांकाने भारतातील अनेक पदार्थ चाखले आहेत.

रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये पाणीपुरी असावी ही कल्पना प्रियांकाची होती. पार्टी स्टार्ट करण्यासाठी स्टार्टर उत्तम असावा आणि यासाठी पाणीपुरीपेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही असं तिचं मत आहे.” या रेस्टॉरन्टच्या मेन्यूमध्ये भारतीय पदार्थांचा काळजीपूर्वक समावेश करण्यात आला आहे.

मेन्यूमध्ये दही-कचोरी, कुल्छा, बकेट व्हीट भेल, बटर चिकन, कोफ्ता-कोरमा, फिश करी यासोबत अनेक भारतीय पदार्थांचा समावेश आहे. या सर्वच भारतीय पदार्थांनी परदेशी खवय्यांना अस्सल भारतीय चवीच्या अक्षरशः प्रेमातच पाडलेले दिसत आहे. मात्र आता प्रियांका पुन्हा एकदा रेस्टॉरंटमधील एका मेन्यूमुळे चर्चेत आली आहे. हा पदार्थ म्हणजे मुंबईचा वडापाव.

हो! खरं आहे. प्रियंका चोप्राच्या सोना रेस्टॉरंटमध्ये वडापावदेखील मिळतो. मात्र एका वडापावची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल. या वडापावची किंमत १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात साधारण १ हजार रुपये इतकी आहे. मुंबईमध्ये सर्वांचा आवडीचा असणारा वडापाव आता सातासमुद्रापार जाऊन प्रियांकाच्या उपहारगृहाद्वारे अमेरिकेच्या लोकांच्या मनावरही राज्य करत आहे.

प्रियांका चोप्राच्या या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आणि तिथल्या पदार्थांची चव चाखून त्यांचे कौतुकही केले आहे. प्रसिद्ध निर्मात्या आणि थिएटर आर्टिस्ट लोला जेम्स यांनी नुकतेच प्रियांकाच्या सोना रेस्टॉरंटला भेट दिली. तिथे लोला जेम्स यांनी भारतीय पदार्थांची चव घेतली. यात त्यांनी मुंबईची ओळख असलेला वडापाव खाल्ला.

शिवाय त्यांनी भेळ, चाट आणि इतरही पदार्थांचा आस्वाद घेतला. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना त्यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोंना कॅप्शन देत म्हटले की, ‘सोना न्यूयॉर्क अप्रतिम आहे, यात काहीच आश्चर्य नाही. प्रियांका चोप्रा याबाबतीत कधीच चुकत नाही.’