ज्येष्ठ बंगाली साहित्यिक शरतचंद्र चॅटर्जी यांच्या गाजलेल्या ‘देवदास’ या कादंबरीवर मराठी चित्रपट येत आहे. मराठीतील प्रख्यात अभिनेता मंगेश देसाई देवदासच्या मुख्य व्यक्तिरेखेत दिसणार असल्याची माहिती आहे. चंद्रमुखी आणि पारोच्या भूमिकांसाठी अभिनेत्रींचा शोध सुरु आहे.
मंगळवारी या चित्रपटाचा पहिला टीझर लाँच होणार आहे. ऋतुराज धालगडेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. भगवानदादांवर आधारित ‘एक अलबेला’ चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेमुळे मंगेशवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्यानंतर पुन्हा त्याच्या वाट्याला महत्त्वाची भूमिका येत आहे.
हिंदीत या चित्रपटाचे तीन रिमेक गाजले, मात्र विविध भाषांमध्ये आतापर्यंत 16 वेळा ही साहित्यकृती मोठ्या पडद्यावर दिसली आहे. के. एल. सैगल, दिलीपकुमार आणि शाहरुख खान यांनी साकारलेल्या देवदासच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या होत्या, तर अभय देवलच्या मॉडर्न देवदास अर्थात ‘देव डी’चीही चर्चा झाली होती.
‘बाबुजीने कहा गाँव छोड दो, सब ने कहा पारो को छोड दो, पारोने कहा शराब छोड दो’, ‘कौन कम्बख्त बरदाश्त करने के लिये पिता है’ यासारखे जबरदस्त संवाद असलेला शाहरुखचा देवदास प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला होता. आता ही तगडी डायलॉगबाजी मराठीत ऐकायला मिळण्याची संधी आहे.