झी युवा’ वाहिनीवरील सोमवार ते शनिवार संध्याकाळी ८ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेतील आप्पा प्रेक्षकांच्या आवडीचे झालेले आहेत. मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे जतन करण्याची इच्छा मनात असलेले हे आप्पा, मराठीचा अट्टाहास करत असतांना अनेकदा दिसून येतात. या आप्पांशी, म्हणजेच अभिनेते सुनील गोडबोले यांच्याशी त्यांच्या भूमिकेविषयी आणि मालिकेविषयी मारलेल्या या गप्पा..
१. ही भूमिका करत असतांना कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे?
या भूमिकेविषयी मला विचारण्यात आलं, तेव्हा मला आनंद झाला होता. या आनंदाचं, कारण म्हणजे या भूमिकेचं वेगळेपण! सर्वच भूमिका आव्हानात्मक असतात. पण, या भूमिकेसाठी शुद्ध आणि स्पष्ट मराठीचा वापर करावा लागणार होता. या पात्राची एक स्वतःची अशी खसियत होती. त्यामुळे ही भूमिका आव्हानात्मक वाटली आणि मी ती स्वीकारायचं ठरवलं.
२. या भूमिकेसाठी काय तयारी करावी लागली?
या भूमिकेसाठी फार मेहनत घेण्याची गरज पडली नाही. याआधी ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांमधून काम केलेलं असल्याने, शब्दांचे उच्चार, लहेजा वगैरे गोष्टींचा अभ्यास आधीच झालेला होता. पण, चित्रीकरणाच्या किंवा नाटकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतांना, असे अनेक आप्पा मला भेटले. त्यांच्यातील ज्या गोष्टी आवडल्या त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न मी केला. त्यामुळे हे पात्र अधिक खुलत गेले आहे.
३. इंग्रजी भाषेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात मराठी भाषेवर पडत आहे. यावर तुमचे मत काय?
इंग्रजी ही सर्वमान्य भाषा झालेली आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेला महत्त्व नाही, असं अजिबातच नाही. पण, मराठी भाषेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची जपणूक झालीच पाहिजे. मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रेम राहिलेलं नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे मराठी भाषा येणं, ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. भूमिकेविषयी बोलायचं तर, आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे मराठी भाषा आलीच पाहिजे, हा आप्पांचा बाणा आहे.
४. तरुण कलाकारांसोबत काम करण्याच्या तुमच्या अनुभवविषयी थोडंसं सांगा.
हल्लीचे तरुण कलाकार हे गुणवत्तेत आमच्या काळातील तरुण कलाकारांहून उजवे आहेत अस मला वाटतं. तंत्रज्ञान, विविध समाजमाध्यमे यांचा पुरेपूर वापर करून, फायदा करून घेणं या पिढीला शक्य आहे आणि ते करण्याची त्यांची तयारी आहे. अशा कलाकारांसह काम करायला आपोआपच मजा येते. अर्थात, तरुणपणीच प्रसिद्धी मिळायला लागल्याने, या तरुणांनी प्रसिद्धीच्या मागे धावू नये, एवढं मी त्यांना नक्की सांगेन.
५. शूटिंगदरम्यानचा एखादा मजेशीर किस्सा आम्हाला सांगाल का?
आप्पा आणि नचिकेत यांचा एक प्रसंग चित्रित करायचा होता. रात्रीच्या वेळी हे दोघे भेटलेले असतात आणि त्यांच्यात संवाद सुरू असतो, असा हा प्रसंग होता. पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही छत्र्या घेऊन चित्रीकरणाच्या ठिकाणी पोचलो. एवढ्यात पाऊस थांबला आणि आम्ही छत्र्या बंद केल्या. पण, चित्रीकरण सुरू करत असतांना पुन्हा पाऊस आला आणि छत्र्या उघडाव्या लागल्या. हे असं दोन-तीनवेळा घडलं. शेवटी, ‘पाऊस असो अथवा नसो, छत्र्या उघड्या ठेवूनच प्रसंग चित्रित करायचा’ असा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर अजिबातच पाऊस पडला नाही, तरीही आम्ही छत्र्या उघडून उभे होतो; अर्थात, पाऊसच नसल्याने या प्रसंगात, छत्रीवरून गळणारं पाणी मात्र कुठेही दिसलं नाही.