मित्रांनो!, निळू फुले हे नांव माहीत नसणारा मराठी चित्रपट रसिक आणि हे नुसतं नाव जरी ऐकले तरी त्याकाळी काळजाचा थरकाप न होणारी स्त्री सापडणे मुश्किल होते. काल निळूभाऊंचा स्मृतीदिन होता. त्या निमित्ताने त्यांचे काही खास रंजक किस्से आमच्या रसिक वाचकांसाठी…
बालपणापासूनच निळूभाऊंना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यांच्या आवाजात होता भारदस्तपणा. घोग-या, बसक्या आवाजातून फुटणारा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणा-या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भितीच्या कवेत घेऊन यायचा. ही ओळख आहे निळू भाऊ अर्थात निळू फुले यांच्या असामान्य अभिनय क्षमतेची. त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव आणि संवाद हे निळू फुले यांचं खरं बलस्थान होते.
काही कारणासाठी निळूभाऊ गावोगाव गेल्यानंतर तिथल्या शिक्षिका, नर्स त्यांच्यापासून चार हात दूर रहायच्या. ही त्यांच्या अभिनयाला खरी पावती होती. निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला . घरात 11 बहिण भाऊ, त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणा-या पैशांवर चरितार्थ चालवत होते.
लहानपणापासूनच निळूभाऊंच्या अंगात खोडकरपणा होता. बहिणींची ते खोड काढायचे मात्र त्यांच्यावर तितकंच प्रेमही होतं. बालपणापासूनच निळूभाऊंना अभिनयाची प्रचंड आवड होती. आपली अभिनय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये ‘ येरा गबाळ्याचे काम नोहे ‘ हा वग लिहिला.
त्यानंतर पु . ल . देशपांडे यांच्या नाटकात ‘रोंगे ‘ ची भूमिका साकारुन त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले . मात्र ‘ कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातील भूमिका आणि सखाराम बाईंडरमुळे ते ख-या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले. अनेक नाटक आणि सिनेमात त्यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या.
सिंहासनमधला पत्रकार आणि विनोदी भूमिकाही त्यांनी खुबीने वठवल्या. मात्र रसिकांना त्यांचा खलनायकच भावला. त्यांच्या सिनेमात एकतरी बलात्काराचा सीन असायचाच. यावर विनोद करताना निळूभाऊ म्हणायचे, “कथा तिच, बलात्कारही तोच, बाई ही तीच, कमीत कमी तिची साडी तरी बदला”.
निळूभाऊंनी अडीचशेहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या भूमिका आपल्या अभिनयानं गाजवल्या… मात्र रंगभूमीवर काम करताना त्यांना वेगळाच आनंद मिळायचा. सखाराम बाईंडर या नाटकात साकारलेल्या सखारामच्या भूमिकेनं तर निळूभाऊंना यशशिखरावर पोहचवलं. या नाटकाला अभिनेता अमरीश पुरी यांनी हिंदीत साकारण्याचा प्रयत्न केला. मात्र निळूभाऊंच्या अभिनयाची उंची इतकी होती की सखारामच्या भूमिकेला त्यांच्याशिवाय कुणीच न्याय देऊ शकणार नाही असे गौरवोद्गार अमरीश पुरी यांनी काढले होते.
समाजासाठीच कला ही शिकवण त्यांनी आयुष्यभर जोपासली. सेवादलाच्या कलापथकात काम करीत असताना आपल्या नोकरीच्या कमाईतील १० टक्के वाटा समाजासाठी, सेवादलाच्या उपक्रमांसाठी देण्याचा नियम त्यांनी कसोशीने पाळला. पुढेही नाटके, चित्रपट यांच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधी उभा केला. समाजाचे ऋण मानणार्या, माणुसकी जपणाऱ्या, संवेदनशील अशा या ज्येष्ठ कलाकारानं १३ जुलै २००९ रोजी जगाचा निरोप घेतला.