जवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांची ही आवडती मालिका बंद झाल्यानंर या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. प्रेक्षकांची उत्सुकता पाहाता झी मराठी वाहिनीनं नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला.

‘माझा होशील ना’ असं या नवीन मालिकेचं नाव आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाला. या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार असे अनेक ज्येष्ठ कलाकार या प्रोमोमध्ये दिसतायत. प्रोमोवरून ही लव्हस्टोरी असल्याचं पाहायला मिळत असून प्रेक्षक या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहेत.