‘तुझ्यात जीव रंगला’ चे चित्रीकरण थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश : वेड लावले आहे. रांगडा ‘राणादा’ आणि अंजली बाईंचा सुरेख प्रवास आता फार रंजक वळणावर आलाय. बऱ्याच गाजलेल्या मालिकांच्या स्पर्धेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोन्ही कलाकारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकेचा प्रेक्षकवर्गही दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र, या मालिकेमुळे गावातील गावकऱ्यांना त्रास होत असल्याचे दिसते. कारण, या मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामंपचायतीकडे निवेदन दिले आहे.
कोल्हापुरातील वसगडे या गावात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे चित्रीकरण केले जाते. चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जातोय. तसेच, ज्या वाड्यात मालिकेचे चित्रीकरण केले जाते त्याचे मालक चाहत्यांना तसेच गावकऱ्यांना अर्वाच्य भाषा वापरत असल्याचा आरोपही केला जातोय.
दरम्यान, या मालिकेवर १०० हून अधिक लोकांचा तात्पुरता रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण सुरु राहावे, यासाठी आज अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळातर्फे गावकऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच, महामंडळ आज गावकऱ्यांना भेटून त्यांची समजूतही काढणार आहे.