लपाछपीचे नाबाद ५० दिवस
‘एकच खेळ लपाछपीचा..’ असे गाणे गुणगुणणारी कावेरी आणि ती तीन मुलं आठवली,की आजही अंगावर सर्र काटा उभा राहतो. भूतांचा हा लपंडाव संपूर्ण महाराष्ट्रात आजदेखील मोठ्या उत्साहात पाहिला जात आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार विशाल फुरिया दिग्दर्शित ‘लपाछपी’ सिनेमाने नाबाद ५० दिवस पूर्ण केले आहेत. एरव्ही सिनेमागृहात दोन किवा जास्तीतजास्त तीन आठवड्यांतच गाश्या गुंडाळणाऱ्या मराठी चित्रपटाच्या यादीत ‘लपाछपी’ हा सिनेमा अपवाद ठरला आहे.
पूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेला हा भयपट, १४ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, काही सिनेमागृहात हा चित्रपट आजही दाखवला जात आहे.
वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर प्रस्तुत आणि मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील निर्मित तसेच मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश सहनिर्मित हा सिनेमा यापूर्वी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्येदेखील गाजला होता. महाराष्ट्रातही त्याने आपला थरार कायम राखत हॉररपटाचा नवा आयाम मराठीत सिनेसृष्टीत रुजू केला आहे. ‘लपाछपी’ सिनेमाला मिळत असलेल्या या घवघवीत यशाबद्दल प्रस्तुतकर्ते सुर्यवीरसिंग भुल्लर यांनी आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ‘मराठी सिनेमांना सुगीचे दिवस आले असले तरी, हॉरर सिनेमाला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. बॉलीवूड भयपटांचीसुद्धा हीच दशा आहे. मात्र, ‘लपाछपी’ सिनेमाच्या यशामुळे भारतातील हॉररपटांना देखील सुगीचे दिवस येतील’ असा विश्वास भुल्लर व्यक्त करतात.