‘काय झालं कळंना’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री गिरीजा प्रभू ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धेतून आपल्या नृत्याचा जलवा दाखवत आहे. या तिच्याशी गप्पा मारल्या असता, नृत्य स्पर्धेच्या या मंचावरील आपला अनुभव तिने शेअर केला.
१. ‘युवा डान्सिंग क्वीन’ मधील कोणता स्पर्धक तुला सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो?
सगळ्याच जणी खूप मेहनत घेत आहेत. पण, सगळ्यात मोठं आव्हान पूर्वा शिंदेचं आहे, असं मी म्हणेन. गेल्या काही आठवड्यातील तिचा परफॉर्मन्स बघून ही गोष्ट जाणवते आहे. आम्ही सगळ्याच जणी इथे जिंकण्याच्या उद्देशाने आलो आहोत; त्यामुळे पूर्वाचे आव्हान सगळ्यांसाठीच मोठे असणार आहे.
२. मयूर आणि सोनालीपैकी तुझा अधिक लाडका परीक्षक कोण आहे?
आम्हाला उत्तम परीक्षक लाभलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या टिप्स या स्पर्धेसाठी तर उपयोगी पडतीलच, पण त्याचा पुढील आयुष्यात सुद्धा खूप फायदा होईल. या दोघांपैकी कुणा एकाला फेवरेट म्हणणं मला जमणार नाही. दोघेही माझे लाडके आहेत.
३. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म्स तू या स्पर्धेच्या निमित्ताने हाताळले आहेस. त्याविषयी आम्हाला काय सांगशील?
माझ्यावर पहिल्याच दिवसापासून विश्वास दाखवण्यात आला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. विविध प्रकारच्या डान्स फॉर्म्सवर नृत्य करण्याची संधी मला त्यामुळेच मिळू शकली. माझा एमजे परफॉर्मन्स सगळ्यांनाच खूप आवडला आहे. आजही त्याविषयी मला प्रतिक्रिया मिळतात. त्या परफॉर्मन्सची तयारी एका रात्रीत केली होती. साहजिकपणे मनावर दडपण होतं. पण, आजही माझं सादरीकरण लोकांना लक्षात राहिलेलं आहे, त्यामुळे कष्टाचं चीज झाल्याचं समाधान मला मिळालं.
४. ओंकारसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगशील?
ओंकार सरांसोबत काम करायला खूपच छान वाटतं. ओंकार सर आमचे कोरिग्राफर असणार आहेत, हे कळल्यावर मला आनंद झाला. अर्थात, त्यांच्यासोबत काम करण्याचं दडपण सुद्धा होतंच. उत्तम कोरिओग्राफीला आपण न्याय देऊ शकू का, ही शंका मनात होतीच. ओंकार सरांनी मात्र, आमची सगळी भीती घालवून टाकली. प्रत्येक आठवड्यात सरांची नवीन आयडिया पाहायला आणि अनुभवायला मिळते. सरांना सातत्याने इतकं भन्नाट कसं सुचू शकतं, असा प्रश्न अनेकवेळा पडतो.
५. प्रॅक्टिसदरम्यानची धमाल, मजा किंवा एखादा किस्सा आम्हाला सांगशील का?
दिवसातून १० ते १२ तास आमची प्रॅक्टिस सुरू असते. त्यामुळे भरपूर धमाल करायला फारसा वेळ मिळत नाही. पण, आम्ही सर्वजण अगदी आवर्जून एकत्र जेवायला बसतो. इतरवेळी आपापल्या प्रॅक्टिसमध्ये गुंतलेल्या आम्ही सगळ्याजणी त्यावेळी छान गप्पा मारतो. रात्री रूमवर आल्यावर सुद्धा आम्ही लगेच झोपत नाही. गाणी ऐकणं, गप्पा, एकमेकींची थट्टामस्करी अशा गोष्टी सुरू असतात. वेळात वेळ काढून, दिवसभराच्या बिझी वातावरणात थोडं रिलॅक्स होण्याचा आमचा प्रयत्न असतो.