‘एक अलबेला’ च्या निमित्ताने अवलियाच्या अनोख्या जीवनप्रवासाचे दर्शन
- Review : Ekk Albela (2016)
- Producer : Dr Monish Babre
- Directer : Shekhar Sartandel
- Star Cast : Mangesh Desai as Bhagwan Dada, Vidhyadhar Joshi, Prasad Pandit, Swapnil Rajshekhar, Vighnesh Joshi, Shekhar Phadke, Shriram Kolhatkar, Arun Bhadsavle, Vidya Balan
- Writer : Shekhar Sartandel & Amol Shetge
- Music : Santosh Mulekar
- Genre : Drama
- Certification : U
- Review By : Rasik Tirodkar
एखाद्या अवलियाच्या आयुष्यावर जीवनपट बनवणे हे काही साधं-सोपं काम नव्हे. त्यासाठी करावा लागणारा अभ्यास, कलाकारांची निवड, तंत्रज्ञान आदी बाबींचा विचार करणं आवश्यक असतं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट तयार करायचा आहे त्याचा काळ लक्षात घेऊन त्याच्या सादरीकरणाबाबत काळजी घेणे आवश्यक असते. या संपूर्ण गोष्टीसाठी सध्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक अलबेला’ हा चित्रपट.
‘एक अलबेला’ हा चित्रपट भगवान आबाजी पालव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. भगवान आबाजी पालव यांना भगवान दादा म्हणून पण संबोधले जाते. यांनी जगभरातल्या सिनेप्रेमींना त्यांच्या अभिनयाने, नृत्यशैलीने वेड लावले. भगवान दादा यांनी फायटिंगचे जास्त चित्रपट केले म्हणून ते फायटर हिरो म्हणून प्रसिध्द होते. फायटिंग चित्रपट करणारे भगवान दादांनी अलबेला हा चित्रपट केला आणि मूकपट ते बोलपट, स्टंट ते हॉरर असा प्रवास करणा-या भगवान दादांनी अलबेला मधून व्यावसायिक चित्रपटांना एक वेगळी उंची मिळवून दिली.
‘एक अलबेला’ मधून भगवान दादांसारखा अवलिया योग्यरितीने साकारण्यात अभिनेता मंगेश देसाई यांना यश मिळालं आहे. मंगेश देसाईंनी अत्यंत चोख पध्दतीने भगवान दादांचा अभिनय केला आहे. त्यांचं बोलणं, वागणं, हावभाव या बारीक सारीक गोष्टींवर भर दिला आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री विद्या बालनचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण झालं आणि तिने गीता बाली यांची भूमिका साकारुन मराठी सिनेसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ग्लॅमरस तेजस्वी पाटीलने भगवान दादांच्या पत्नीची भूमिका उत्तम साकारली आहे.
या चित्रपटात एकूण १२ गाणी आहेत आणि या गाण्यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ही १२ गाणी अतिशय सुरेख पध्दतीत जुळून आली आहेत. या चित्रपटाची १९५० च्या काळातील कथा आणि त्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट चित्रिकरण या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून उदय देवरे यांनी छायांकन सुंदर केले आहे. भगवान दादांचा अनोखा प्रवास शेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनातून चित्रपटांत दाखवण्यात आला आहे.
गीता बाली ‘अलबेला’च्या निमित्ताने भगवान दादांच्या चित्रपटाच्या आयुष्यात आले. तसेच ‘एक अलबेला’च्या निमित्ताने विद्या बालन मराठी चित्रपटात आली. विद्या बालन, मंगेश देसाई, तेजस्वी पाटील, सुंदर सादरीकरण, गाण्यांतून भगवान दादांच्या आठवणींना दिलेला उजाळा या सर्व गोष्टींचा एकत्रित मिलाफ म्हणजे ‘एक अलबेला’.