मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवरील आशयघन चित्रपटांची निर्मिती होत असते आणि त्यांचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत असतं. प्रेम हा एक असा विषय आहे, ज्याचे कितीही पैलू चित्रपटाद्वारे सादर केले गेले तरी त्यातील नावीन्य तसूभरही कमी होत नाही. त्यामुळेच प्रेक्षकाही पुन्हा पुन: प्रेमावर आधारलेल्या चित्रपटांच्या प्रेमात पडतात. रसिकांवरील प्रेमाखातर लेखक-दिग्दर्शकही प्रेमातील अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपल्या कलाकृतींद्वारे करतात. असाच एक नवा कोरा कलरफुल लव्हस्टोरी असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Dil Bedhund ‘दिल बेधुंद’ असं या रंगीबेरंगी प्रेमकथेचं टायटल आहे.

ओसिअन कर्व्हज एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्माते शिवम पाटील यांनी तयार केलेल्या ‘दिल बेधुंद’ या चित्रपटाचं टायटल पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारं ‘दिल बेधुंद’ चित्रपटाचं टायटल पोस्टर सध्या प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. संतोष गोपाळराव फुंडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात काहीतरी नावीन्यपूर्ण आणि आजवर चित्रपटांमध्ये दाखवलेल्या प्रेमकथांपेक्षा वेगळं आणि बेधुंद करणारं असं काहीतरी पहायला मिळणार असल्याची झलक दाखवणारं हे टायटल पोस्टर आहे. प्रत्येकानं कधी ना कधी आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी वळणावर प्रेम केलेलं असतं किंवा त्याला प्रेमाची अनुभूती झालेली असते. त्यामुळे प्रेम हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. एका सदाबहार प्रेमकथेला सुमधूर संगीताची किनार जोडत काहीसं वेगळ्या धाटणीचं कथानक सादर करण्याचा प्रयत्न ‘दिल बेधुंद’मध्ये करण्यात आला आहे. ‘दिल बेधुंद’चं लेखन करणाऱ्या गुड्डू देवांगन यांनीच या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. या चित्रपटाचं टायटल पोस्टर जितकं प्रभावी आहे, तितकाच चित्रपटही लक्षवेधी बनल्याचं मत व्यक्त करत दिग्दर्शक संतोष फुंडे म्हणाले की, टायटलप्रमाणेच प्रेक्षकांना या चित्रपटात एक बेधुंद करणारी कलरफुल प्रेमकथाही पहायला मिळेल. ही प्रेमकथा प्रेमातील गुलाबी रंगाची उधळण तर करेलच पण त्यासोबतच अंतर्मुख होऊन विचारही करायला लावेल. निखळ मनोरंजनातून समाजाला एक विचार देण्याचं कामही या चित्रपटाद्वारे करण्यात आल्याचंही फुंडे यांचं म्हणणं आहे.

या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी पवन रेड्डी यांनी केली असून, संकलन रवी पाटील आणि विनोद राजे यांनी केलं आहे. संगीतकार स्वप्नील शिवणकर यांनी या चित्रपटातील गीतरचनांना सुमधूर स्वरसाज चढवला आहे. अभिजीत कुलकर्णी व विष्णू घोरपडे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिलं असून, पब्लिसिटी डिझाईन करण्याचं काम श्री मुसळे यांनी केलं आहे. ‘दिल बेधुंद’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.