कलर्स मराठी दिवाळी विशेष !
दिवाळीची चाहूल ही एक महिन्या आधीपासून लागते. घराघरांमध्ये फराळाच्या पदार्थांचे खमंग वास येतात, दिवाळीसाठी कंदील, पणत्या, तोरणं यांची खरेदी सुरु होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय होऊन जाते. दिवाळीच्या दिवशी दिव्यांचा असंख्य ओळी घरात लावल्या जातात. खासकरून लहान मुलांची दिवाळीत धामधूम असते. किल्ले तयार करणे, दिवसभर फटाके फोडणे या लहानपणीच्या आठवणी घेऊनच आपण सगळे मोठे झालेलो असतो. प्रत्येकाचा दिवाळीतील एक दिवस आवडीचा असतो. याचबद्दल कलर्स मराठीवरील काही कलाकार सांगत आहेत त्यांच्या या दिवाळी विशेष सदरामध्ये…. सरस्वती मालिकेतील सरस्वती आणि देविका, घाडगे & सून मालिकेतील अक्षय आणि अमृता, चाहूल २ मालिकेतील सर्जा आणि राणी, अस्स सासर सुरेख बाई मधील दिग्विजय आणि जुई, कॉमेडीची GST एक्सप्रेस मधील अवधूत गुप्ते..
अवधूत गुप्ते – कॉमेडीची GST एक्सप्रेस
itembomb समीर चौगुले आणि करंजी म्हणजे शैला काणेकर
दिवाळी हि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते. चहुबाजूला प्रसन्न वातावरण असते. तसं बघायला गेल तर मला संपूर्ण दिवाळीच खूप आवडते. पण, लक्ष्मीपूजन हे विशेष आवडते.
कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमाच्या सेटवर आम्ही खूप धम्माल मस्ती करतो. सगळ्यांशीच खूप छान bonding जमलं आहे. समीर चौगुले म्हणजे itembomb कारण तो या कार्यक्रमात एका पेक्षा एक स्कीट करून सगळ्यांना हसवतो आणि शैला काणेकर म्हणजे अत्यंत गोड अशी करंजी …
तितिक्षा तावडे – सरस्वती मालिकेतील सरस्वती
देविका म्हणजेच जुई माझ्यासाठी दिवाळीतला चिवडा
दिवाळीचा सन म्हणजे कंदील, चहू बाजूला प्रकाश, पणत्या, रांगोळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. या सगळ्यामध्ये सगळ्यांचीच आवडती गोष्ट म्हणजे फराळ. फराळामध्ये मला चकली खूपच आवडते.
मला लहानपणापासून दिवाळीचा पहिला दिवस खूपच आवडतो. सर्वजण एकत्र येऊन फराळ करतात, फटाके उडवतात, नवीन कपडे, गप्पा गोष्टी करतात हे सगळचं मला खूप आवडत. पण आता विचाराल तर मला दिवाळीचा आदला दिवस खूप आवडतो त्याच कारण असं कि, खूप खरेदी करायला मिळते घरच्यांसाठी, स्वत:साठी. घराची साफ-सफाई हे सगळं एक दिवस आधी होते त्यामुळे मला आदला दिवस आता जास्त आवडतो.
सेटवर माझी आणि जुईची आता खूप चांगली मैत्री झाली आहे. मी तिला चिवड्याची उपमा देईन सगळ्या चवी एकत्र … थोडीशी गोड, तिखट, नमकीन अश्या स्वभावाची.
जुई गडकरी – सरस्वती मालिकेतील देविका
सरस्वती म्हणजे तितिक्षा माझ्यासाठी रव्याचा लाडू !
दिवाळी म्हंटल कि मला एक गोष्ट सगळ्यात आधी आठवते आणि ती म्हणजे फराळ… जो मला खूप आवडतो. दिवाळीची वाट मी फराळासाठी बघते असं म्हणायला हरकत नाही. त्या फराळामधला आईच्या हातचा चिवडा आणि चकली मला खूप आवडते. लहानपणापासून मला संपूर्ण दिवाळी मधला भाऊबीज जास्त जवळचा वाटतो ! आमच एकत्र कुटुंब आहे त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी आम्ही सगळे भावंडे मिळून खूप मजा करतो. माझी बहीण भावना हिच्या वर माझा खूप जीव आहे त्यामुळे हा दिवस माझ्या नेहेमीच जवळ राहील. गिफ्ट पेक्षा या दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा अनमोल आहे.
तितिक्षा माझ्यासाठी रव्याचा लाडू आहे… स्वभावाने गोड, वरून कडक वाटली तर क्षणार्धात विरघळणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी !
सुकन्या कुलकर्णी – घाडगे & सून मालिकेतील माई घाडगे
चिन्मय उदगिरकर म्हणजे चिवडा आणि लवंगी (फटाका) म्हणजे अतिशा नाईक
घाडगे & सून च्या सेटवर दिवाळीची तयारी सुरु झाली आहे, घराला यावेळेस नवा रंग देण्यात येतो आहे कारण अक्षयच म्हणजेच माझ्या नातवाचा हा पहिला पाडवा आहे. घरामध्ये सगळे मिळून फराळाची तयारी करत आहेत. कोणती साडी घालावी, मगं रंग सारखा नको, गजरे हवे सगळ्या घरातल्या बायकांची अशी चर्चा सुरु आहे. दिवाळीतले सगळेच दिवस तसे खास असतात पण, त्यातला माझ्या आवडीचा दिवस म्हणजे भाऊबीज. घरातले सगळे मंडळी एकत्र येतात, गप्पा होतात, सगळ्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे ते कळतं त्यामुळे मज्जा येते.
चिन्मय उदगीरकर याला मी चिवड्याची उपमा देईन. थोडा गोड, थोडा तिखट तर फटाक्यातील लवंगी म्हणजे आमची वसुधा म्हणजेच तुमची लाडकी अतिशा नाईक.
चिन्मय उदगीरकर – घाडगे & सून मालिकेतील अक्षय घाडगे
अण्णा म्हणजे प्रफुल्ल सामंत माझ्यासाठी बेसनाचा लाडू !
मला पाडवा खूप आवडतो… कारण यादिवशी नवीन सुरुवात होते सकाळपासून जे संस्कृतीक कार्यक्रम सुरु होतात त्यामुळे वातावरणामध्ये नवेपण, चैतन्य, पावित्र्य निर्माण होतं.
मला फराळामध्ये म्हणाल तर मला बेसनाचा लाडू खुप आवडतो. आमच्या घाडग्यांच्या परिवारामध्ये देखील या लाडवाचे गुणधर्म असलेली एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे अण्णा – प्रफुल्ल सामंत जे माझे खूप आवडते आहेत, एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. ते कुणालाच दु:खवत नाही, बेसनाच्या लाडूला परंपरा आहे तशीच अण्णाच्या विचारांना देखील परंपरा आहे. म्हणून अण्णा मला बेसनाच्या लाडवासारखे वाटतात.
भाग्यश्री लिमये – घाडगे & सून मालिकेतील अमृता घाडगे
माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी माझ्यासाठी चिरोट्यासारख्या !
दिवाळी सुरु झाली याची नांदी देणारा नरकचतुर्दशीचा दिवस म्हणजे आता चार दिवस नुसती मौज, मजा, मस्ती त्यामुळे हा दिवस मला खूपच आवडतो. आदल्या दिवशी आजीच सरू होतं “मुलांनो उद्या नरकचतुर्दशी, कृष्णानं नरकासुराचा वध केला तो दिवस सर्वांनी पहाटेलवकर उठायला हवं. बाहेर झुंजूमुंजू होत असत. अंगणात येऊन पाहिलं कि कंदील, रांगोळ्या आणि पणत्यांनी सारा आसमंत उजळून निघालेला असतो. जणू हा दिवस सगळ्यांना सांगतो दिवाळी सुरु झाली उठा तेजाचं स्वागत करा. आनंदाची उधळण करा.
घाडग्यांच्या घरची अमृता… तिची ही पहिली दिवाळी. मला विचाराल तर घरातल्या माई म्हणजे जणू चिरोट्यासारख्या वाटतात, अनेक पदर असलेल्या, गोड, सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या. अक्षय म्हणजे चिन्मय जणू बेसनाचा लाडू… सर्वांचा आवडता… बेसनाच्या लाडवाशिवाय दिवाळीचा फराळ पूर्णच होत नाही. मृदू स्वभावाचा, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असा…
अक्षर कोठारी – चाहूल २ मालिकेतील सर्जेराव
शांभवी म्हणजे रेश्मा माझ्यासाठी शंकरपाळीसारखी !
चाहूल २ मालिकेतील तुमचा लाडका सर्जा म्हणजेच अक्षर कोठारी याला दिवाळीतले जवळ जवळ सगळेच पदार्थ खूप आवडतात. पण, त्यामधील सगळ्यात जास्त करंज्या आवडत असल्याचे तो आवर्जुन सांगतो. बाहेरून खुशखुशीत आणि आतून एकदम सोफ्ट. दिवाळीत करंज्या खाण्यासाठी मी वर्षभर वाट पाहतो असे देखील तो म्हणतो. चाहूल २ च्या सेटवर सुद्धा दिवाळीतील 2 पदार्थांबरोबर मी काम करतो.. दररोज.. बेसनचे लाडू आणि शंकरपाळी.. केतकी म्हणजेच तुमची आवडती राणी ही बेसनचे लाडू, कारण तिचे मालिकेमधील मधील पात्र अत्यंत मृदु स्वभावाचे आहे पण ती खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तशीच आहे..
रेश्मा म्हणजे शांभवी जिच्याबरोबर मी आता जवळ जवळ एक वर्षांपासून करतो आहे ती शंकरपाळी आहे असे मला वाटते. रेश्मा माझी खूप खास मैत्रिण आहे.. आमचं एकमेकांवर भयंकर प्रेम आहे पण आम्हाला एकमेकांशी भांडल्याशिवाय चैन पडत नाही.. त्यामुळे टणक आणि गोड असं काहीसं कॉम्बिनेशन.
दिवाळीतला आवडता दिवस – माझा दिवाळीतील लहानपणापासूनचा आवडता दिवस लक्ष्मी पूजन.. कारण मला लहानपणी वाटायचं.. लक्ष्मीची पूजा केल्यावर मी मोठा झालो की खूप श्रीमंत होणार…
केतकी पालव – चाहूल २ मालिकेतील राणी
चाहूल २ च्या सेटवरची पहिली दिवाळी !
लहानपणापासून मी दिवाळीची आतुरतेने वाट पाहते कारण त्यावेळेस याची कारणे जरा वेगळी होती. एक म्हणजे शाळेला एक महिना सुट्टी मिळत असे, आणि घरात गोडधोड पदार्थांची चंगळ असायची. पण आजही या दिवाळीचा उत्साह कमी झालेला नाही. भाऊबीज हा माझा सगळ्यात जवळचा आणि आवडता दिवस आहे.
चाहूल २ मालिकेच्या सेटवर एकूणच कुटुंबासारख वातावरण असतं. आमचे स्पॉटदादा आमची बरीच काळजी घेत असतात. आमचे दोन लाडके दादा आहेत एक मंगेश दादा आणि गज्या दादा. केवळ कलाकार नव्हे तर संपूर्ण युनिटला काय हवं नको याची मनापासून काळजी घेतात. या वेळेसची दिवाळी मी या दोघांनाही फराळ देऊन साजरी करणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून मला देखील आनंद होईल.
संतोष जुयेकर – अस्स सासर सुरेख बाई मालिकेतील दिग्विजय
अभिजित चव्हाण म्हणजे बेसनाचा लाडू
दिवाळी म्हणजे सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. कंदील, दिव्यांची रोषणाई असते, नातेवाईक येतात, सगळ्यात महत्वाचं घरी फराळ बनतो. मला लक्ष्मीपूजन खूप आवडत. आम्ही मित्र, घार्तले सगळे मिळून पत्ते खेळतो आणि भाऊबीज बहिणी कडे जायचं मस्त पोटभर जेवायचं, गप्पा मारायच्या. मला अजुनही आठवत मागच्यावर्षी मी पुण्यामध्ये शुटींग करत होतो आणि मी एका हॉटेलमध्ये लक्ष्मीपूजन साजर केलं होतं.
मला फराळामध्ये बेसनाचा लाडू आवडतो आणि आमच्या सेटवर देखील बेसनाचा लाडू आहे तो म्हणजे अभिजित चव्हाण जे स्वभावाने अतिशय गोड आहेत.