19 मार्चला सिनेसृष्टीने आपले सर्व शुटिंग, कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेला एक महिना सेलिब्रिटी घरी आहेत. सेलिब्रिटींच्या आयुष्यातला अविर्भाज्य भाग असतो, तो म्हणजे फिटनेस. पण कॉरन्टाइनच्या काळात सर्व जीम, फिटनेस स्टुडियोज बंद असल्याने सेलेब्स त्यांच्या इन्स्ट्रक्टरसोबत वर्कआऊट करू शकत नाही आहेत.
पण सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर आणि ब्रायन डिसुझा ह्यांनी ह्यावर तोडगा काढला आहे. हे सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर कपल सध्या वर्च्युअल क्लासेसव्दारे आपल्या विद्यार्थ्यांना फिट ठेवण्याचा प्रयत्न करतायत. रीमा-ब्रायन ही जोडी मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सखी गोखले, सुव्रत जोशी, सिध्दार्थ मेनन अशा जवळ जवळ 25 ते 30 सेलिब्रिटींची फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे.
लॉकडाउन झाल्यापासून रीमा आणि ब्रायन आपल्या फिटनेस फ्रिक विद्यार्थ्यांसाठी व्हिडीयोकॉलव्दारे रोज क्लासेस घेतात. ह्यात अर्थातच स्नेहलता वसईकर, हृता दुर्गुळे, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. आपल्या ‘वर्कआउट ऑफ दि डे’ (वॉड) ह्या फिटनेस स्टुडियोव्दारे रीमा वेंगुर्लेकर अष्टांग योगाचे ट्रेनिंग देते. तर ब्रायन डिसुझा फंक्शनल ट्रेनिंग शिकवतो.
‘वर्कआउट ऑफ दि डे’ (वॉड)ची संस्थापक आणि फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर सांगते, “सध्या देशभरात करोना व्हायरसमूळे लॉकडाउन आहे. त्यामूळे जसं आपण आजारी पडू नये म्हणून वर्क फॉर्म होम करणं किंवा घरीच राहणं गरजेच आहे. तसंच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदरूस्त राहणंही गरजेच आहे. त्यामूळेच आम्ही काही वर्च्युअल ग्रुप क्लासेस घ्यायला सुरूवात केली. ह्यात जे आमच्याकडे पहिल्यापासून फिटनेससाठी येतात, त्यांनाच नाही तर नव्या स्टुडंट्सचाही समावेश आहे. कॉरन्टाइनमध्ये थोडा वेळ मिळालाय, तर आता काही दिवस स्वत:कडे पाहण्याचा संकल्प सोडलेल्या नवोदितांनाही आम्ही काही फ्री क्लासेसव्दारे प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय. ह्या फिटनेस फ्रिक स्टुडंट्समध्ये काही मराठी सेलिब्रिटींही आहेत. त्यांच्यासाठी आम्ही व्हिडीयो कॉलव्दारे वैयक्तिक क्लास घेतो. आणि मला आनंद आहे, लॉकडाउननंतर त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.
”ब्रायन डिसुझा म्हणतो, “सततच्या धावपळीच्या आयुष्यात मग ते सेलिब्रिटी असो की, सामान्य माणूस आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामूळे ह्या लॉकडाउनचा फिटनेसव्दारे स्वत:वर सकारात्मक बदल घडवून आणण्याची हिच वेळ आहे. आणि मला आनंद आहे, की स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे, दिप्ती केतकर, स्नेहलता वसईकर, ह्या माझ्या सेलिब्रिटी स्टुडंट्सनी स्वत:ला फिट ठेवण्याचा विडा उचललाय.”