प्रेमाची नशा चढवणा-या ‘ड्राय डे’ चे रॉमेंटीक साँग लाँच 

कोणत्याही मद्यपानाविना चढणारी नशा म्हणजे ‘प्रेम’. प्रेमात पडलेला प्रत्येकजण या गुलाबी रंगाच्या नशेत धुंद झालेला असतो. प्रेमाची हीच नशा ‘ड्राय डे’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच ‘अशी कशी’ हे रॉमेंटीक गाणे लाँच करण्यात आले.
संजय ए. पाटील निर्मित या सिनेमातील हे प्रेमगीत पाहणाऱ्यांचे मूड फ्रेश करून टाकतो.
आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या दुनियेचे रंगीत सफर या गाण्यातून घडून येते. ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर आधारित असलेले हे गाणे, नव्याने प्रेमात पडलेल्या युगुलांना आपलेसे करीत आहे. जय अत्रे लिखित या गाण्याला हिंदीचे सुप्रसिद्ध गायक जोनीता गांधी आणि अॅश किंग यांचा गोड आवाज लाभला आहे. शिवाय या गाण्याचे चित्रीकरण काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी झाले असून, श्रीनगरच्या आल्हाददायी निसर्गाचा अनुभव या गाण्यातून रसिकांना घरबसल्या घेता येणार आहे.
थोडक्यात काय तर, ‘ड्राय डे’ या शीर्षकाला साजेल असा हा सिनेमा असून, प्रेमाची नशा मद्याहून अधिक सरस असल्याची जाणीव ‘अशी कशी’ हे गाणे करून देते. येत्या १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या ‘ड्राय डे‘ चे लेखन दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच केले असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांचे आहे. यात ऋत्विक आणि मोनालिसा या जोडीबरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए,अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.