बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ११ डिसेंबर, १९२२ साली पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव युसुफ खान होते. सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले तेव्हा देविका राणी यांनी त्यांचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले.
दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये ६२ सिनेमात काम केले. त्यांनी शेवटचा सिनेमा फक्त १२ लाख रुपयात साइन केला होता आणि त्यांना पूर्ण रक्कम कॅशमध्ये मिळाली होती. मात्र हा चित्रपट काही पूर्ण होऊ शकला नाही. मीडिया पोर्टल सेलिब्रेटी नेटवर्थच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांची संपत्ती जवळपास ८.५ कोटी डॉलर इतकी आहे. हे रुपयात सांगायचे तर ६३४.२१ कोटी रुपये होते.
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा सरकारने दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची किंमत ८० लाख ५६ हजार रुपये निश्चित केली आहे. दिलीप कुमार यांचे इन्कम सोर्सचे स्त्रोत अभिनयच आहे. ते राज्यसभेचे सदस्य होते. दिलीप कुमार त्यांच्या काळात सर्वाधीक मानधन घेणार कलाकार होते. १९५० च्या काळात ते एका चित्रपटासाठी एक लाख रुपये मानधन घेत होते. ही रक्कम त्याकाळात खूप जास्त होती.
दिलीप कुमार यांची तब्येत जेव्हा खालावयाला सुरुवात झाली होती त्याचकाळात भावांसोबतचा बंगल्यासाठीचा वाद सुरू झाला होता. अस्लम खान आणि एहसान खान हे दिलीप कुमार यांचे दोन भाऊ. पाली हिल, वांद्रे येथील बंगला क्रमांक- १६ साठी हा वाद होता. हा बंगला १ हजार ६०० चौरस मीटरपर्यंत पसरलेला आहे. या मालमत्तेचे एकूण मूल्य २५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
दिलीप कुमार यांच्या वतीने सायरा बानो यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी शपथपत्र दाखल केले होते. यात दिलीप कुमारांच्या दोन्ही भावांचा या संपत्तीत वाटा नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं. या मालमत्तेसाठी वर्ष २००७ मध्ये अॅग्रीमेन्ट करण्यात आलं होतं. यात दिलीप कुमार यांना भाऊ एहसान यांना १ हजार २०० चौरस फूट जागा द्यावी तर दुसरा भाऊ अस्लमला ८०० चौरस फूट जागा द्यायची होती. पण नंतर दिलीप कुमार यांना तो बंगला पाडून तिथे इमारत करायची होती. ज्यासाठी बंगला काही दिवस रिकामी करायचा होता. परंतु भावांनी बंगला रिकामी करण्यास नकार दिला.
हा बंगला १९५३ मध्ये दिलीप कुमारांनी विकत घेतला होता. बरीच वर्ष हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. २०१७ मध्ये दिलीप कुमार यांनी तो बंगला पाडला आणि तेथे इमारत बांधकामाचं काम सुरू केलं. असं म्हटलं जातं की या इमारतीत एक संग्रहालय असेल, तसेच इमारतीचा अर्धा भाग दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या नावावर असेल.
इतर कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. मात्र दिलीप कुमार यांना झगमगाटीपासून दूर रहायला आवडत होते. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांनी एकदा सांगितले होते की त्यांचे कपडे ते पाली नाका येथील एका टेलरकडून शिवतात. हा टेलर तेव्हापासून त्यांचे कपडे शिवत होता जेव्हा ते वांद्रे येथे राहत होते.