होय मित्रांनो!, बॉलीवूड ग्रीक गॉड अभिनेता ह्रतिक रोशनने त्याचा या आगामी चित्रपटाबाबत एक अपडेट दिलीय. ह्रतिक रोशनची ‘फायटर’ ही भारतातली पहिली एरिअल ऍक्शन फिल्म ठरणार आहे. अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

‘फायटर’ चित्रपटातून हे दोघेही पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटासाठी जगभरातून शॉट्स घेतले जाणार असून सुरक्षा दलातील जवानांना एक खास मानवंदना देण्यात येणार आहे. तसंच या चित्रपटासाठी त्यांना नवा स्टुडिओ पार्टनर देखील मिळाला आहे.बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातील को-स्टार दीपिका पादुकोण हिच्यासोबत एक फोटो शेअर केलाय.

या फोटोमध्ये दोघेही स्माईल करताना दिसून आले. त्याच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता दाखवत या फोटोसोबत एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘टेक ऑफ करण्यासाठी आमची गॅंग तयार आहे…’ असं त्याने या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या कॅप्शनमध्ये त्याने #Fighter असा हॅशटॅग देखील वापरलाय.

अभिनेता शाहरुख खान अभिनित ‘पठाण’ फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद लवकरच ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘फायटर’ हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. तसंच भारतातली ही पहिलीच एरिअल ऍक्शन फिल्म असणार आहे. तसंच या चित्रपटासाठी जगभरातील ठराविक लोकेशन्स सीलेक्ट करून शॉट्स घेतले जाणार असल्याचं बोललं जातंय.

त्यामूळे या चित्रपटासाठी जगभरातील प्रेक्षक दृष्टीसमोर ठेवून चित्रपटावर काम करण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलंय. या चित्रपटासाठी ‘वायकॉम १८’ चा नवा स्टु़डिओ देखील मिळाला असून या बॅनरखाली ममता आनंद, रमन चिब्ब आणि अंकु पांडे हे काम करणार आहेत. सुरवातीला ‘मरफ्लिक्स’ या प्रोडक्शनसोबत काम करण्याचं ठरलं होतं. पण आता त्यांच्यासोबत वायकॉम १८ स्टूडियो बोर्ड सुद्धा काम करणार आहे.

अभिनेता ह्रतिक रोशनच्या वाढदिवशीच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दररोज या चित्रपटा संदर्भात नवीन अपटेड समोर येत असतात. ऍक्शन-थ्रिलर असलेल्या या चित्रपटात अभिनेता ह्रतिक रोशन हाय व्होल्टेज ऍक्शन आणि एरिअल स्टंट करताना दिसणार आहे. या चित्रपटात ह्रतिक रोशन एका एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

पण दीपिका या चित्रपटात कोणती भूमिका साकारणार आहे, हे मात्र अद्याप जाहीर केलेलं नाही. हा चित्रपट भारतीय सेनेचं साहस, बलिदान आणि देशभक्तीला समर्पित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. तब्बल २५० कोटी रूपयांचं बजेट असणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी भारतीय पातळीवर हा चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुद्धा केलीय. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत रिलीज करण्यात येणार आहे.