ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकर ‘प्लॅनेट मराठी’च्या सल्लागार पद
जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ चा अनुभव देणाऱ्या या ‘प्लॅनेट मराठी’चा डिजिटल रिलीज हा मुख्य हेतू आहे. जेव्हापासून ‘प्लॅनेट मराठी’ची घोषणा झाली तेव्हापासूनच खरंतर त्याच्याशी अनेक मोठी नावे जोडली जात आहेत. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमित भंडारी ‘प्लॅनेट मराठी’मध्ये सहभागी झाल्याची घोषणा झाल्यानंतर सिंगापूरमधील व्हिस्टास मीडिया कॅपिटल या मनोरंजन कंपनीनेही ‘प्लॅनेट मराठी’सोबत हातमिळवणी केली. प्लॅनेट मराठीचे ग्रह शक्तिशाली होत असतानाच आता यात आणखी एका नावाची भर पडली आहे. ऑस्कर ज्युरी उज्वल निरगुडकरही या प्लॅनेटमध्ये सहभागी झाले आहेत.
२०१७ मध्ये ऑस्कर अकादमीतर्फे आमंत्रित करण्यात आलेले आणि तांत्रिक विभागात (Members at large) सदस्य म्हणून सहभागी होणारे उज्वल निरगुडकर हे पहिले भारतीय आहेत. २०१९ मध्ये ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली यांना भारतात आणण्यात आणि भारतीय सिनेसृष्टीला जागतिक मान्यतेचे मार्ग खुले करण्यात उज्वल निरगुडकर यांची महत्वाची भूमिका आहे. जागतिक पातळीवर कलेचा वारसा , तंत्रज्ञान आणि कला जोपासण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे उज्वल निरगुडकर म्हणजे प्लॅनेट मराठीसाठी जमेची बाजू आहेत. मराठी आशय, प्रतिभा आणि चित्रपट निर्मिती कला यांना जागतिक उंचीवर नेण्यासाठी ते सल्लागाराचे काम पाहणार आहेत. महान कलाकृतींचे जतन, पुनर्स्थापना आणि भाषांतर करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक फेलोशिप मिळाल्या आहेत तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांना जागतिक पातळीवर नेले आहे. केवळ भाषा म्हणून नव्हे तर मनोरंजनाचे विकसित माध्यम म्हणून ‘मराठी’ला जागतिक स्थरावर पोहोचवण्याचे मराठी प्लॅनेटचे स्वप्न उज्वल निरगुडकर यांच्या सक्षम सहकार्याने प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्न आहे.
प्लॅनेट मराठीच्या संलग्नतेबाबत उज्वल निरगुडकर म्हणतात, ”प्लॅनेट मराठीच्या टीममध्ये सल्लागार म्हणून सामील झाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मराठी भाषेला साहित्याचा समृद्ध वारसा लाभला असूनही त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही. मात्र उत्तम तंत्रज्ञान आणि मार्केटिंगच्या बळावर प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे शक्य करून दाखवले आहे. जगभरातील मराठी भाषिकांसाठी चोवीस तास मराठी चित्रपट, वेबसिरीज, लाइव्ह इव्हेंट्स या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध होतील. मीडिया आणि एंटरएंटरटेनमेंटच्या जगतात भारतातील प्रादेशिक भाषेची ताकद यातून निश्चितच कळून येईल आणि मला खात्री आहे, की प्लॅनेट मराठी यात नक्कीच अग्रेसर असेल.”
दूरदृष्टी ठेवून ‘प्लॅनेट मराठी’ सारखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर व्यापक दृष्टिकोनातून घेतलेल्या आपल्या निर्णयाबाबत सांगतात, ”कोविड19 नंतर मनोरंजन क्षेत्र संक्रमणावस्थेतून जात आहे. चित्रपट निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अर्थपूर्ण आणि मनोरंजनात्मक आशय निर्मितीचे कौशल्य असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचण्यास आपण कमी पडतो. ही वस्तुस्थिती आहे. मराठी चित्रपट, शोज, आशयपूर्ण डिजिटल कार्यक्रम यांच्या सादरीकरणात आणि ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात प्लॅनेट मराठी नक्कीच क्रांती घडवेल. उज्वल निरगुडकर हे प्लॅनेट मराठीच्या टीममध्ये सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदा प्लॅनेट मराठीला निश्चितच होणार आहे. केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे तर जागतिक पातळीवर असलेल्या दिग्गजाने त्यांच्यासमोर आलेले मराठी व्यासपीठाचे मूल्य समजून घेतल्याचा मला आनंद आहे.”
प्लॅनेट मराठी ओटीटीच्या पोर्टफोलिओमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे मनोरंजनप्रेमी, व्यावसायिक, चित्रपट निर्माते, गुंतवणूकदार आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मराठी मनोरंजनसृष्टीला सकारात्मक गती मिळण्याची शक्यता आहे.