असं म्हणतात की ” जर मनुष्याच्या आतून मनातून काहीतरी करण्याची जिद्द ” असेल, तर तो काहीही करू शकतो. त्याच्यासाठी कोणत्याच गोष्टी अशक्य नाहीत. उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा ” नरेंद्र प्रताप सिंह ” यांनी हे सत्यात उतरवून दाखवलं आहे.
घरी परिस्थिती ठीक नव्हती. हलाखीची होती. गरिबी घराच्या कोपऱ्यात गोचिडासारखी चिकटून बसलेली होती. ज्यामुळे त्याला खूप चांगलं शिक्षण मिळू शकलं नाही; पण त्याने मात्र हार मानली नाही. त्यानं जागेपणी एक स्वप्न पाहिलं. त्याला सत्यात साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ध्येयवादी धोरण ठेवलं आणि यशाला गवसणी घातली. आज शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर सर्व अडचणींवर विजय मिळवला आहे. त्याच्या विजयाचं प्रतिक म्हणजे, भारतीय सैन्यात ” लेफ्टनंट ” म्हणून त्याची झालेली नेमणूक. यासाठी एनडीएची तयारी करावी लागते. मोठ मोठे क्लासेस लावावे लागतात. पण अश्या कोणत्याच तयारीसाठी त्याच्याकडे कोणतचं शुल्क नव्हतं.
” नरेंद्र प्रताप सिंह ” उत्तरप्रदेशातल्या प्रतापगडमधील कतरौली गावात लहानाचा मोठा झाला.
त्याचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी. आता शेतकरी कसं जगतो ? हे काय वेगळं सांगायला नको. कमी खर्चात शिक्षण व्हावं, म्हणून घराच्या जवळील मलहण येथील आदर्श इंटर कॉलेजमधून नरेंद्रने बारावी पूर्ण केली. त्यानं लहानपणीचं एक स्वप्न पाहिलं होतं, की देशसेवा करायची. आता मोठं झाल्यावर बालपणातील स्वप्न साकार करण्याची आणि एनडीएची परीक्षा देण्याची वेळ आली होती. कारण त्यामधून चांगल्या पदावर जाऊन देशाची सेवा करण्याची संधी त्याला मिळणार होती; पण वडिलांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती, की त्याला एनडीए कोचिंगसाठी फी भरायला जमेल. ज्यामुळे पुन्हा स्वप्नांवर भला मोठा दगड ठेवून, कानपूर विद्यापीठातून बी.एस्सी. शिक्षण त्याने सुरू केलं. आर्थिक परिस्थिती जरी त्याच्या हातात नसली, तरी ज्ञानाची वाट सुपीक करणं त्याच्या हातात होतं. अभ्यासाच्या जोरावर. तेही विनामूल्य. म्हणूनच त्याने बीएस्सी बरोबर सैन्यात भरती होण्याची तयारी जोमात सुरू केली.
तब्बल दोन वर्षांच्या कसून केलेल्या अभ्यासू सरावा नंतर, भारतीय सैन्यात त्याने पहिलं स्थान पटकावलं. २००६ मध्ये नरेंद्र जवान म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाला खरा; पण अजुनही त्याचं स्वप्न साकार झालं नव्हतं. सैन्यात भरती झाल्यानंतरही त्याने आपला पुढील अभ्यास चालूच ठेवला आणि २०१२ मध्ये इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१४ मध्ये सिक्किम मनी पाल विद्यापीठातून एमबीए (एचआर) केलं. घरगुती जवाबदारीचा भार जास्त होता, म्हणून तो नोकरी करून अभ्यासाला वेळ देऊ लागला.
सेना ऑफिसरसाठी घेण्यात येणाऱ्या SSB परीक्षेत कमी गुणांमुळे बर्याच वेळा बाहेर पडावं लागलं…
सैन्यात भरती झाल्यानंतर अधिकारी होण्याचं स्वप्न त्याला साकार करायचं होतं. त्यामुळं तो तयारी करतचं राहिला. याच दरम्यान, २००८ मध्ये त्याने अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबीपर्यंत पोहचला. अधिकारी होण्यासाठी त्याला एसएसबी परीक्षा क्लियर करायची होती, यावेळी त्याला खात्री होती की होईल पास होईल ! पण इथं ही तो नापास झाला. यानंतर त्याने २०११ आणि २०१३ मध्ये दोनदा एसीसी (ACC -आर्मी केड कॉलेज) ची परीक्षा क्लिअर केली, परंतु एसएसबीमध्ये दोन्ही वेळेस नापास झाला.
कर्तव्याची तयारी कशी करावी ?
एसीसीमध्ये दोन वेळा नापास झाल्यानंतर नरेंद्रने अजून जास्तीची मेहनत केली. मग २०१५, २०१७, २०१९ मध्ये SCO ( स्पेशल कमिशंड ऑफिसर ) ची परीक्षा दिली; पण इथही निराशाचं हाती लागली. याच काळात पुन्हा एकदा CDS ची परीक्षा दिली. निकाल आला, पुन्हा फेल !..
६ वेळा नापास झाल्यानंतर घरून, नातेवाईक यांच्याकडून नकारात्मक रिस्पॉन्स येत होता. त्यामुळे नरेंद्र ही थोडा खचला. सगळ्यांना वाटलं होतं, की आता नरेंद्रचं अधिकारी होण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. पण नरेंद्रने पुन्हा ठरवलं, की आता थांबेल तर अधिकारी होऊनच. अपार कष्ट घेतलेल्याला कधी अपयश मिळत नाही. एक ना एक दिवस यश मिळतचं. २०१९ मध्ये नरेंद्रने सेना मधील अंतर्गत परीक्षा पीसी ( एसएल ) दिली. शेवटी यश आनंदाचा सोहळा घेऊन धावून आलं. तो परीक्षेत पास झाला. त्याच्यासोबत देशातून १९ जण पीसी ( एसएल ) परीक्षेतून निवडले गेले होते. सगळ्यांना डेहराडून येथील, इंडियन मिलेट्री एकेडमीत ट्रेनिंग देण्यात आली. त्यानंतर झालेल्या पासिंग आऊट परेड नंतर भारतीय सैन्यात नरेंद्र ” लेफ्टनंट ” अधिकारी झाला.
गावातील तरुणांना प्रोत्साहन द्यायला, त्याने केलेली सुरुवात कौतुकास्पद..
नरेंद्र ने खूप गरीबी पाहिली. कोचिंग आणि चांगली तयारी न करता त्याला सैन्य अधिकारी होणं खूप कठीण गेलं. त्यामुळे त्याने गावातील तरुणांना परीक्षेसाठी तयार करण्याचे काम हाती घेतलेलं आहे. जेव्हा जेव्हा तो सुटीच्या दिवशी गावाला येतो, तेव्हा तेव्हा लष्कराच्या तयारीशी संबंधित टिप्स देतो, जेणेकरून मुलांना थोडी मदत मिळू शकेल. त्याने सैन्यात 13 वर्षे सैन्यात सेवा केली आहे. बराच काळ त्याची तैनात दहशतवाद प्रभावित जम्मू-काश्मीरमध्येही होती…
अश्या देशसेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या, आदरणीय लेफ्टनंट अधिकारी नरेंद्रसिंह यांना अमुक तमुक चा कडक सलाम !…