प्रिय नागराज , खरं तर तुला पत्र लिहायचं तर माझ्याकडे काहीच कारण नाही. पण मग असा प्रश्न निर्माण येतो की ,प्रत्येक गोष्ट घडायला कारणच पाहिजे का ? कारणाशिवाय पत्र लिहीलं तर ते समोरच्या पत्त्यावर पोहोचणार नाही का ,? प्रत्येक गोष्टीमागे आपण कारणेच शोधली पाहिजेत का ?असो , आज आमचे मित्र प्रशांत भाऊ गडाख यांची फेसबुक पोस्ट वाचली, आणि नकळत तुला पत्र लिहिण्यासाठी हातात पेन आला. तू कोरोना बाधितांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधी मध्ये दहा लाख रुपयांची मदत केली. नागराज मंजुळे
हे त्या पोस्टवरून कळलं. खरंतर आपल्या चित्रपट सृष्टीतील अभिनेत्यांनी अजून खिशात हात घातला नसताना तू केलेल्या मदतीची बातमी ही तू सांगतोस त्याप्रमाणे जातीपातीच्या गटा- तटाच्या बुरुजावर आदळणाऱ्या तोफ गोळ्याप्रमाणे वाटली. प्रशांत भाऊंनी जर पोस्ट केली नसती तर कदाचित आम्हाला ही बातमी कळली ही नसती, आणि ती आम्हाला कळू न देण्याचीही नेहमीप्रमाणे तू काळजी घेतली होतीस .
कारण तुला माहिती आहे प्रगतीच्या वाटेवरचा सर्वात मोठा अडसर म्हणजे प्रसिद्धी आहे. म्हणून तर तू प्रसिद्धीच्या झोताला आपल्यापासून नेहमी बाजूला ठेवतोस. तू जास्त फिल्मी पार्ट्यांमध्ये ही जात नाहीस .खिरापत वाटल्यासारख्या एफ एम चॅनल ला इंटरव्ह्यू देत बसत नाहीस.कुणी कौतुक करावं म्हणून कधीच काम करत नाहीस.आज एक डझन केळी वाटली तरी लोक दोन डझन फोटो सोशल मीडियावर फोटो अपलोड करतात.
अशा या ‘शायनिंग’ जगात तू या हाताने केलेली मदत या हाताला सुद्धा समजू देत नाहीस. खरंतर या गोष्टीसाठी तुझं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. पण ते ही तुला आवडणार नाहीच म्हणा..! आपले मित्र प्रशांत भाऊ गडाख यांच्यात आणि तुझ्यात मला कमालीचे साम्य दिसते .प्रशांत भाऊ सुद्धा अहोरात्र समाजसेवा करतात .सामाजिक सेवेमधील त्यांचे अतुलनीय कार्य मी जवळून अनुभवले आहे. त्यांनी कुणाला मदत केली तर ती मदत सुद्धा विसरून जाणं ते पसंद करतात. म्हणतात ना समविचारी लोकांचीच मैत्री होत असते .तुम्हा दोघांची मैत्रीही आमच्यासारख्यांना खूप प्रेरणादायी ठरते आहे.
तुझी लहानपणापासूनची खंत होती की ,शाळेत मला जे येतं त्याची कधीच परीक्षा घेतली गेली नाही .पण नागराज तुला जे येत होतं ना त्याची परीक्षा सगळ्या जगाने घेतलीय. आणि निकालही दिलाय. असो, तुझ्या नवीन येणाऱ्या चित्रपटासाठी ‘झुंड’ साठी खूप खूप शुभेच्छा .. हे पत्र मी सोशल मीडियावर टाकतोय , जेणेकरून तुझं पाहून का होईना इतरांना खिशात हात घालायची प्रेरणा मिळेल आणि या कोरोनाला पराभूत करण्यासाठी अजून काही हात पुढे येतील.
कळावे,
तुझाच चाहता : किरण बेरड
चित्रपट कथालेखक
अहमदनगर
Nagraj Popatrao Manjule
Nagraj Manjule