हास्य सम्राट भाऊ कदम यांच्यासोबत गप्पा
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून सगळ्यांच्या घरात पोहचलेले अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. हास्य सम्राट म्हणून पण त्यांना ओळखले जाते. मराठी धमाल टीमने भाऊंशी गप्पा मारल्या आणि हास्य सम्राट भाऊंनी काही गोष्टींविषयी आपलं मत व्यक्त केलं.
सुरुवातीचे चित्रपट आणि आताचे चित्रपट या दोन काळामध्ये विशेष असा काय फरक वाटतो असं विचारल्यावर भाऊ सांगतात, “पूर्वीच्या काळात पण वेगवेगळ्या पठडीतले चित्रपट असायचे. तसेच आता ही वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट येतात. काही चालतात तर काही चालत नाहीत. सध्याच्या चित्रपटात प्रेक्षक चित्रपटाच्या कथेचा विचार करतात. सध्या हिरो दिसला तरंच चित्रपट पाहायचा असं होत नाही. हे सैराट, टाईमपास, बालक-पालक या चित्रपटांनी सिध्द केलंय.”
चित्रपटाचे छायांकन आणि VFX याविषयी भाऊ बोलतात, “तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत आहे. पूर्वी हे सगळं काही जमायचंच असं नाही. आता चित्रपटाच्या बाबतीत छायांकनामध्ये प्रगती होत आहे. VFX सारख्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर होत आहे आणि त्याचा छान निकाल पण सर्वांसमोर येतो.”
चला हवा येऊ द्या मधून भाऊंनी प्रेक्षकांचं मन जिंकलं, याविषयी ते सांगतात, “चला हवा येऊ द्या मधून प्रेक्षकांनी मला खूप मोठं केलं, माझ्या अभिनयावर मनापासून प्रेम केलं. प्रेक्षकांचं आणि माझं नातं वेगळंच आहे. अर्थात आमच्यामध्ये घरातलं नातं निर्माण झालं आहे. प्रयोगासाठी कुठे दौरा असला की प्रेक्षक मला भेटायला, माझ्यासोबत सेल्फी काढायला गर्दी करतात. तसेच मला चिठ्ठ्यांच्या माध्यमातून प्रतिसाद कळवतात.”
भाऊंचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असणार ना. भाऊ सांगत आहेत त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी.
“२२ जुलै रोजी समित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट या चित्रपटातून मी येत आहे. ही वेगळी भूमिका आहे आणि दिग्दर्शक समित कक्कड यांनी मला प्रोत्साहित केलं. दोन लहानमुलांसोबत काम केले जे कठीण होते. कारण माहित असलेल्या कलाकारांसोबत काम करणे एकवेळ सोपे असते. पण हसत-खेळत मी आणि हाफ तिकीट लहान मुलांनी काम केलं. प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘सायकल’ हा पण माझा आगामी चित्रपट आहे.”
भाऊंना STAR मराठी तर्फे त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा!