आज आपण एका तितक्याशा प्रचलित नसलेल्या पण इतिहासातील प्राचीन व काहीसा वेगळा ठसा लाभलेल्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. अर्थातच मंदिर आहे, श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथील. हे मंदिर कणकवली या तालुक्यापासून केवळ 49 किमीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याची गणणा होते. या मंदिराची एकमेव खासीयत म्हणालं तर हे मंदिर संपूर्ण कोकण विभागातील एकमेव अतिप्राचीन मंदिर आहे.
अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची भुमी मानल्या जाते. कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. आणि या देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच दीर्घ काळाने प्रचलीत झाले. अंदाजे ११०० व्या शतकानंतर ऊजेडात आलेले हे स्थान कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणी असाच वर्णावा लागेल.
ज्या “देवगड” शहरातून सर्वदूर महाराष्ट्रात दरवर्षी पहिल्या हापूस आंब्याची निर्यात केली जाते त्या देवगडपासून अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. एसटी थांब्यापासून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.
ऐन किनाऱ्याशी असल्याने उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने आजही सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणाऱ्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२३ मीटर उंचीचा आहे.
मंदिराचा परिसर तटाने वेढलेला तर आहेच, शिवाय खाली जांभ्या दगडांची फरशीदेखील आहे. तर अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, काहीसा रहस्यमय व रोमांचकारी देखील आहे.या मंदिराजवळील सिंधुदुर्ग किल्ला देवस्थानच्या परिसरात समुद्रकिनारी शिवलिंग आढळून येतात.
त्यापैकी सुमारे २१ शिवलिंग ही पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा की, गेली कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असूनदेखील ही शिवलिंग काही अंशी झिज होत असतानासुद्धा पुर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात.
एवढा काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तेवढी झिज झालेली नाही. ही शिवलिंग पांडवांनी घडवलेली आहेत अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. याची साद देणारी पांडवलेणीही आज येथे पहावयास मिळतात.
काही कालावधीआधीच सिंधुदुर्ग किल्ला देऊळ परिसराच्या जवळ पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजले गेलेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या होत्या.
ही गुहा म्हणजे थोडक्यात इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक “लेणीच” आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग प्रकारच्या आढळतात. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा आहे. हा काळा दगड समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयात क्वचित वेळाच सापडतो.
या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते. गुहेची खोली सुमारे ९ फुट लांब, ८ फुट रूंद, आणि ६ फुट उंच असून ५ फुट उंच आणि ३ फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग व नंदी असे २० नग आढळतील. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे.
स्त्री-पुरूष अशा ७ ते ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळा- (काळित्री) दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्या मध्यभागात पण जरा डाव्या बाजूस ठेवले आहेत. गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे असल्याचं जाणवतं.
त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून तर येतेच, शिवाय कौशल्यामध्ये सुबकपणाकडे चांगलेच लक्ष दिले गेले आहे. प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला पहावयास मिळतो. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, तुरा व मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखवले आहेत.
तसेच महाराष्ट्रीयण वळणाची शिरोभूषणे या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात. मुळात कोकण भागात अशा तऱ्हेच्या लेण्या आढळणचं एक प्रकारच गुढ म्हणावं लागेल.