म्युझिक अल्बम क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या सागरिका म्युझिकनं सूर नवा ध्यास नवा या गाजलेल्या कार्यक्रमातील छोट्या सूरवीरांना एकत्र आणलं आहे. खास गणेशोत्सवासाठी “गणराया गणराया हो…” असे शब्द असलेलं गाणं या सूरवीरांनी गायलं आहे. विक्स बँडची निर्मिती असलेल्या सागरिका दास यांची प्रस्तुती आणि दिग्दर्शन असलेलं हे गाणं नुकतेच सागरिका मराठी च्या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.
सागरिका म्युझिकनं आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यातील जवळपास प्रत्येक म्युझिक व्हिडिओ हिट ठरला आहे. बाप्पा मोरया रे, वक्रतुंड महाकाय यांसारख्या गणपतीच्या गाजलेल्या गाण्यांनंतर आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा म्युझिक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. मयुरेश जोशीचे शब्द असलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकरनं स्वरसाज चढवला आहे. तर सई जोशी, सक्षम सोनावणे, अंशिका चोणकर, विदित पाटणकर या सूरवीरांनी हे गाणं गायलं आहे. या सूरवीरांसह मैथिली पटवर्धन आणि सौरभ सुतार हे बालकलाकारही म्युझिक व्हिडिओमध्ये दिसतील.
प्रत्येकजण हा बाप्पा ला आपल्या घरी सुख-शांती, समृद्धी आणि भरभराटीसाठी आपल्या घरी बोलवत असतो लहान मुलं मात्र निरागसपणे बाप्पाची सेवा
करता यावी,दमलेल्या बाप्पाची काळजी घेता यावी यासाठी बाप्पाला आपल्या घरी बोलावतात अशी या गाण्याची संकल्पना आहे.
म्युझिक व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे यातील गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहे. ट्री गणपतीचा वापर या व्हिडीओ मध्ये केला आहे त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्तांना स्वरानंद देतानाच पर्यावरणाचं भान राखण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे