सैराटचा झंझावात काही थांबता थांबेना. आर्ची आणि परश्याची प्रम सध्या राज्याच्या कानाकोपर्यांमधील चित्रपटगृहांतून धुमाकूळ घालते आहे. नागराज मंजूळे दिग्दर्शित चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांकडूनही ‘सैराट’ प्रतिसाद मिळत असल्याने तिसर्या आठवडय़ापर्यंत सगळीकडे हाऊसफुल्लची पाटी झळक ते आहे. ‘सैराट’च्या तिकीटबारीवरील या यशाचा तडाखा इतका जोरदार आहे की मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ात प्रदर्शित होणारे तीन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात 29 एप्रिलला सैराट प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाने तिकीटबारीवरील कमाईचा 25 कोटींचा आकडा पार केला होता. तर दुसर्या आठवडय़ात चित्रपटाने 35 कोटींचा आकडाही पार केला आहे. हा प्रतिसाद आणखी काही काळ कायम राहिला तर त्यांच्या सिनेमाचे बारा वाजणार हे एव्हाना त्यांना कळून चुकलं आहे. म्हणूनच आगामी तीन सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
13 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘पैसा पैसा’ आता 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.तर वैभव तत्ववादी आणि पूजा सावंतचा ‘चीटर’ आता थेट 10 जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रथमेश परबचा ’35 टक्के काठावर पास’ हा सिनेमाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलाय. सैराटचे वाढलेले शोज आणि तुफान प्रतिसाद पाहता लवकरच हा चित्रपट नटसम्राट’चाही रेकॉर्ड मोडून नंबर वन ठरेल, यात काहीच शंका नाही.