half ticket movie review

half ticket movie review

समीत कक्क्ड दिग्दर्शित हाफ तिकीट आज सिल्वर स्क्रिनवर झळकलाय. आपण सुरुवात करणार आहोत हाफ तिकीट या सिनेमापासून. कसा आहे हा सिनेमा, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.

दोन चिमुकल्यांचं भावविश्व रंगवणारा, त्यांची स्वप्न मांडणारा सिनेमा म्हणजे हाफ तिकीट. व्हिडीयो पॅलेस निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट या सिनेमात या दोन निरागस भावांचं आपलं जग रंगवण्याचा प्रयत्न समित कक्कड यांनी केलाय.

बालकलाकार शुभम मोरे आणि विनायक पोतदार या दोघांनी यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आपली स्वप्न साकारण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीनं धडपडत असतो. कोणाची स्वप्न मोठी तर कोणी छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंदी राहतं. हाफ तिकीट या सिनेमातले हे दोन हाफ तिकीट असंच एक स्वप्न पाहतात.

अत्यंत काटकसर करुन त्यांची आई आणि आजी त्यांना मोठं करण्यासाठी झटत असते, तिथे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे दोघं वाटेल ते करायला तयार होतात. या दोघांच्या या अनोख्या प्रवासाला अत्यंत निरागसपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलाय.‘हाफ तिकीट’ हा सिनेमा अशाच दोन धडपडणाऱ्या भावंडांची कथा आहे.

या सिनेमाची कथा खूप सुंदर आहे. त्याची मांडणाही छान झालीये. हाफ तिकीटचं बॅकग्राउंड म्युजिक कमाल झालंय. सिनेमाच्या फ्लेवरप्रमाणे जाणा-या या बॅकग्राउंड म्युजिकमुळे, सिनेमा पाहताना एक वेगळीच मजा येते. सिनेमातील मुख्य पात्र शुभंम मोरे आणि विनायक पोतदार या दोघांनीही आपआपल्या भूमिका अत्यंत निरागसपणं पार पाडल्या आहेत.

दिग्दर्शक समित कक्क्ड य़ांनी त्यांच्याकडून तसं निभावून घेतलंय. या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सिनेमाचं छायाचित्रण. जे अत्यंत सुंदर पद्धतीनं सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी पार पाडलंय.

अभिनेत्री उषा नाईक, प्रियांका बोस, भाऊ कदम या नटांनीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्य़ा आहेत. सिनेमा चांगला झालाय मात्र सिनेमाच्या स्क्रिनप्लेमध्ये काही त्रुटी जाणवतात. अनेक त्याचत्याच गोष्टींवर फोकस केल्यामुळे काही ठराविक वेळेनंतर सिनेमा कंटाळवाणा वाटतो, मात्र पुन्हा नव्याला सिनेमा पिकअप घेतो आणि त्याच गतीनं पुढे सरकतो.

या सिनेमात ड्रामा आहे, इनोसन्स आहे, नात्यांची जाण आहे इन शोर्ट हा एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनर आहे. हाफ तिकीट या सिनेमातील हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देतेय ३.5 स्टार्स.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here