शिकवणी वर्गामुळे गरीब विद्यार्थांची प्रगती धोक्यात! 
🔴भविष्यात शैक्षणिक विषमतेची विषवल्ली निर्माण होण्याचा धोका 
(डाॅ. विलास मोरे) :- मराठवाड्यातील पुणे, शैक्षणिक पंढरी, चळवळीचे माहेरघर, सांस्कृतिक शहर अशा विविध प्रकारच्या विशेषणांनी सेलू शहर ओळखले जाते. मात्र शिक्षण क्षेत्रातील काही झारीतील शुक्राचार्यानी शिक्षणाचा बाजार मांडला असल्याने सेलू शहरासह तालुक्यातील गरीब व श्रीमंत विद्यार्थांमध्ये विषमतेची मोठी दरी निर्माण होत आहे.
एकीकडे सर्वांसाठी शिक्षण या धोरणातून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असल्याचा डंका शासनस्तरावरून पिटला जातो. तर दुसरीकडे शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना त्यावर कोणाचाही अंकुश राहीला नाही. अशी परिस्थिती दिसून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी शिकवणी वर्गाचे दुकाने थाटून अनेक शुक्राचार्य आपल्या झारीतून भरमसाठ पैसे कमवित आहेत. त्यातून श्रीमंत विद्यार्थांच्या प्रगतीच्या वाटा प्रशस्त होत असून दुसरीकडे महागड्या शिकवण्याची कुवत नसलेल्या गरीब वविद्यार्थांची प्रगती धोक्यात आली आहे. या नियमबाह्य शिकवणी वर्गामुळे भविष्यात शैक्षणिक विषमतेची विषवल्ली निर्माण होण्याचा धोका आहे. खाजगी असो वा सरकारी शाळा, महाविद्यालयीन शिक्षकांना शिकवणी वर्ग चालवण्यावर बंदी आहे. यातून महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अभियानामध्ये काही प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत. महाविद्यलयीन शिक्षकांना नियमानुसार महाविद्यालय किंवा विद्यालय परिसरात खाजगी शिकवणी वर्ग घेण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे. तसेच शिक्षक, अधिव्याख्याते व प्राध्यापकांना शिकवणी वर्ग चालवता येत नाही. असे असले तरी सेलूत मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे दिसून येते. सेलू शहरात मोठ्या प्रमाणात शिकवणी वर्ग सुरू आहेत. यामध्ये काही प्रोफेशन शिक्षक स्वतःच्या कुटुंबासाठी हा व्यवसाय करीत असतात तर कमी मेहनतीत जास्त पैसा मिळतो म्हणून काहींचा भलताच हेतू असतो. अशा लोकांकडून या शिकवणीसाठी वारेमाप पॅकेज विद्यार्थांवर लादले जाते. हा गोरखधंदा शहरात खुलेआम सुरू असताना यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे हे लोक वाट्टेल तेवढी फिस विद्यार्थांकडून वसूल करतात. घटनात्मक तरतूदीनुसार शैक्षणिक विषमता वाढू नये म्हणून याची खबरदारी घेणे शासनाची मोठी जबाबदारी आहे. असे असले तरी अशा शिकवणी वर्गासाठी आजपर्यंत कोणतीही काटेकोर नियमावली तयार करण्यात आलेली दिसत नाही. या संदर्भात जे काही नियम सध्या अस्तित्वात आहेत ते देखील पायदळी तुडविल्या जात आहेत. नियमबाह्य चालणाऱ्या शिकवणी वर्गाकडे साधे फिरकण्याचीही पात्रता शासनाच्या शिक्षण विभागाकडे नाही. याची मात्र कमालच वाटते. शहरात मुख्य रहिवासी वस्त्यांमध्ये शिकवणी वर्ग चालतात. याचा त्रास आजुबाजुच्या नागरिकांनाही होतो. विद्यार्थांची वाहने रस्त्यावरच ऊभी केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. शिवाय शिकवणीसाठी येणारे विद्यार्थी दुचाकीवरून रेस करत सुसाट्याने जातात. त्यामुळे अनेक वेळा अपघातही होतात. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे नेहमीच मुलींच्या छेडछाडीची प्रकरणे घडत असतात. परिणामी शहरात फोफावत चाललेल्या शैक्षणिक बाजारीकरणाला आळा घालण्याची गरज आहे.
पुर्ण….