‘झी युवा’ वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नव्या आणि खास गोष्टींचा खजिना घेऊन येते. अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेला ‘युवा सिंगर एक नंबर’ हा कार्यक्रम याच दर्जेदार मेजवानीचा एक भाग आहे. स्पर्धेतील चुरस अधिक वाढलेली असल्याने प्रत्येक स्पर्धकाकडून उत्तमोत्तम सादरीकरण पाहायला मिळत आहे. आपली सर्वोत्तम कला सादर करण्याचा प्रयत्न प्रत्येकच स्पर्धक करत आहे. अनिमेश ठाकूरने आपल्या उत्तम परफॉर्मन्सने अनेकवेळा खास छाप पाडली आहे. मागचा आठवडा सुद्धा याला अपवाद ठरला नाही.
सर्वच स्पर्धक उत्तम कामगिरी करत असल्याने, स्पर्धा फारच चुरशीची झालेली आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा याची प्रचिती आली. सर्वच स्पर्धक दर्जेदार परफॉर्मन्स देत असताना, अनिमेश ठाकुरने विशेष ठसा उमटवला. अनेकवेळा परिक्षकांवर आपल्या परफॉर्मन्सने मोहिनी घालणारा अनिमेश या आठवड्यात सुद्धा ‘एक नंबर’ ठरला आहे. दुनियादारी चित्रपटातील, ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ हे गाणं त्याने सादर केलं. गाण्यातील प्रत्येक जागा उत्तमरित्या घेऊन त्याने प्रेक्षक आणि परिक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणातील जादू इतकी उत्कृष्ट होती, की परीक्षकांच्या खुर्चीवर बसलेल्या वैभव मांगले आणि सावनी शेंडे यांना सुद्धा काही काळासाठी त्यांच्या भूमिकेचा विसर पडला होता. प्रेक्षकांच्या भूमिकेत शिरून त्यांनी या गाण्याचा आस्वाद घेतला. अनिमेशचे सादरीकरण हा ‘युवा सिंगर एक नंबर’च्या मागील आठवड्यातील, एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.