‘वर्ल्ड एनिमल डे’ निमित्ताने रीना रंगली आपल्या ‘पेट्स’ सोबत

पाळीव प्राणी यांना माणसांचे खरे मित्र म्हणून संबोधले जातात. आपण जर त्यांना जीव लावला तर ते आपल्यावर जीव ओवाळून टाकतात. आपणदेखील स्वतःवर इतके प्रेम केले नसेल, तितकं प्रेम ते करतात. आणि त्यामुळेच आपल्या जवळील व्यक्तींमध्ये प्राणी पण येऊ शकतात. आज जागतिक प्राणी दिनानिमित्त अनेक प्राणी प्रेमींनी आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी आजचा वेळ काढून ठेवला असेल. मराठी अभिनेत्री रीना अगरवाल हिने देखील आजचा ‘वर्ल्ड एनिमल डे’ आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसोबत साजरा केला. 

नेहमीच्या धकाधकीतून वेळ काढत, थोडा उसंत घेत रिनाने आपल्या लाडक्या प्राण्यांसोबत काही क्षण घालवला. रीनाच्या घरी एक गोंडस मांजर आहे.  मुळात रीनाला प्राण्यांची विशेष आवड असून, केवळ पाळीव प्राणीच नव्हे तर, चित्रीकरणादरम्यान कुठेही तिला स्ट्रीट डॉग जरी आढळला तरी ती त्याला खाऊपिऊ घालण्यास मागे पुढे पाहत नाही.  जीवाला जीव देणाऱ्या या  प्राण्यांना गोंजारतानाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. नुकताच तिने सोशल नेट्वर्किंग साईटवर आपल्या पेट्ससोबतचे काही फोटो शेअर करत आपला हा आनंद तिच्या चाह्त्यांसोबत शेअर केला आहे.