आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता उमेश कामत, याने ‘आणि काय हवं?’ या लघुमालिकेत उत्तम अभिनय केला आहे. प्रिया आणि उमेशने एकत्र काम केलं असलेली ही मालिका ‘झी युवा’ वाहिनीवर रविवारी पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने उमेश कामत याच्याशी केलेली ही खास बातचीत;
१. ‘आणि काय हवं?’ या लघुमालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी थोडंसं सांग. या व्यक्तीरेखेत आणि तुझ्यात काही साम्य आहे का?ही भूमिका खूपच वेगळी आहे. अरेंज मॅरेज असूनही बायकोवर मनापासून खूप प्रेम करणाऱ्या प्रत्येक नवऱ्याला, साकेत आपलासा वाटेल. आमच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. मात्र, साकेत आणि जुई ज्याप्रकारे संसार एन्जॉय करत आहेत, तसाच आम्ही सुद्धा अजूनही करतो. त्यामुळे साकेतच्या अनेक गोष्टी माझ्यात आहेत, असं मी नक्कीच म्हणेन.
२. प्रियाची तुला आवडणारी आणि नावडती एक गोष्ट?तिच्या मनासारखी गोष्ट घडली नाही तर ती पटकन चिडते. तिला प्रत्येक गोष्ट परफेक्टच लागते, त्यामुळे तसं घडतं. अर्थात, यात तिने आता बराचसा बदल केला आहे. अत्यंत परफेक्ट असणं, ही तिची चांगली गोष्टच कधी कधी फार वाईट ठरते, असं मी म्हणेन. जुईचं काहीसं तसंच आहे. त्यामुळे जुई आणि साकेतच्या घरात यामुळे ज्या गोष्टी घडतात, तशाच काही गोष्टी आमच्या घरात सुद्धा घडतात.
३. जुई आणि प्रिया यांच्यात काही साम्य आहे का?जुई आणि प्रिया यांच्यात काही गोष्टींमध्ये साम्य आहे. जसं साकेतमधील काही गोष्टी माझ्यात आहेत तशाच जुईच्या स्वभावातील काही गोष्टी प्रियामध्येही आहेत. अर्थात, कुठल्याही विवाहित मुलीला आवडेल अशी जुई आहे. स्वतःच्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात यासाठी केलेले प्रयत्न, मजामस्ती, प्रेमासाठी असलेला उत्साह या गोष्टी जुई आणि प्रिया या दोघींमध्ये सारख्या आहेत, असं मला वाटतं.
४. या सिरीजमध्ये लग्न झालेल्या जोडप्याची कथा पाहायला मिळते. सिरीजमधील प्रसंगासारखाच एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला आहे का?आपल्या आईच्या हातचं जेवण ही अत्यंत आवडीची गोष्ट असते. घरात कुठलाही गोड पदार्थ केला गेला, की आईच्या हातचं जेवण हा विषय नेहमीच निघतो. साकेत ज्याप्रमाणे ‘आईच्या हातची पुरणपोळी’ यावरून अनेकदा जुईला टोकतो, आईच्या स्वयंपाकाची आठवण काढतो, तसंच आमच्या घरातही होत असतं.
५. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही दोघे कसा वेळ घालवत आहात?लॉकडाऊनमध्ये दिनक्रमात आम्ही खूप जास्त व्यस्त आहोत. कारण, घरातील कामं करायची वेळ एरवी येत नाही. मात्र सध्या घरकाम सुद्धा करावं लागत आहे. सगळ्याच गोष्टी कराव्या लागत असल्यामुळे फार वेळ मिळत नाही. पण, संध्याकाळचा वेळ रिकामा ठेवण्याचा प्रयत्न असतो. काहीतरी नवीन शिकणं, ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या करायला वेळ काढतो. अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे. त्यामुळे दिवस कसा संपतो ते कळतंच नाही.
६. ‘झी युवा’वर ‘आणि काय हवं?’ या लघुमालिकेचं प्रक्षेपण होणार आहे, म्हणजे तुझा रविवारचा प्लॅन तयारच असेल. याविषयी काय सांगशील?मी माझं स्वतःच काम पुन्हा पुन्हा बघायचं टाळतो. पण, ‘आणि काय हवं?’ ही लघुमालिका याला अपवाद आहे. त्यामुळे, अर्थातच रविवारचा संध्याकाळचा वेळ ही सिरीज बघण्यासाठी मी मोकळा ठेवणार आहे. प्रिया आणि मी दोघे मिळून ‘आणि काय हवं?’ ही गोड आणि प्रेमळ अशी मालिका बघणार आहोत. सगळ्यांनीच ती अवश्य बघायला हवी, हे आवर्जून मी प्रेक्षकांना सांगेन.