वेगावर ताबा, अपघात टाळा
कलाकारांनी केल्या आपल्या भावना व्यक्त
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे याने फेसबुकवर एक व्हिडियो शेअर केला आणि सर्व सामान्यांपासून सिनेवर्तुळातही याची चर्चा रंगू लागली आहे. हा व्हिडियो कोणता तर मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्तपणे ट्रक, गाड्या आणि परवानगी नसताना बाईक चालवणार्यांवर सुबोधने आक्षेप नोंदवला आहे. शिवाय मध्येच आडव्या येणार्या गाय आणि बैलांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते हेही निदर्शनास आणले आहे. याच रस्त्यावर अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे यांचे अपघातात निधन झाले. याच पार्श्वभूमिवर काही कलाकारांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नियम ढाब्यावर बसवण्याची सवयच झाली आहे – शिल्पा नवलकर, अभिनेत्री / लेखिका
मला आतापर्यंत तरी असा ट्राफिक जॅमचा अनुभव आलेला नाही. मात्र ट्रक, गाड्या आणि बाईक यांच्या वेगावर काही बंधन नसतेच. खरे तर बाईकना एक्सप्रेस वेवर बंदी आहे. मात्र तेथील जवळच्या गावातील तरूण मुलं वेगात विरुद्ध दिशेने बाईक भरधाव वेगात चालवत येतात. ट्रकसाठी देखील एक लाईन राखीव असते मात्र ते हे सर्व नियम ढाब्यावर बसवत तीन-तीन लेनमध्ये जाऊन इतर वाहनांना पुढे जाऊ देत नाहीत. यातच अनेक अपघात होत असतात. अनेकदा एखादा अपघात झाला असल्यास एक लेन बंद केली जाते तेव्हा तर हे गाडीवाले आणि बाईकस्वार विरुद्ध दिनेशे भरधाव वेगात येतात, अशा वेळेस केवळ त्यांच्याच जीवाला धोका नसतो तर समोरच्या वाहनांनाही अपघाताचा धोका असतो. याची काळजी कोणीच घेत नाही. तेथे उभे असलेल्या पोलिसांच्या समोर हे जात असतात पण तेही त्यांना कोणीच अडवत नाही. अशा नियम न पाळणाऱ्या वाहनचालक, ट्रकचालक आणि बाईकस्वार यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. तरच त्यांना भीती राहील आणि असे अपघात होणार नाहीत. शिवाय प्रत्येकाचीच जबाबदारी आहे कि नियम न मोडणे. त्यामुळे आधी आपल्यापासूनच सुरुवात करूयात.
टोल घेऊनही रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे – शिवकुमार पार्थसारथी, चित्रपट निर्माता
आम्ही ऐरोलीकरांनी ‘टोलविरोधी जन आंदोलन’ पुकारले होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी अनेक खेपा काढल्या. मात्र त्यातून काहीच साध्य झाले नाही. ऐरोली टोलच्या ५ किमी अंतरावर राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना प्रत्येकवेळी टोल भरावा लागणे हे वाहतुकीच्या नियमावलीत नमूद केलेले नाही. याविरुद्ध आम्ही स्थानिक रहिवाशांना टोल माफीसाठी लढा पुकारला मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट आम्हालाच किती पास पाहिजेत? असे उद्धट प्रश्न विचारून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. टोल घेऊन देखील रस्ते अत्यन्त वाईट परिस्थितीत असतात. याबाबत विचारले असता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ते टोल मुंबईतील १७ फ्लायओव्हरच्या डागडुजीसाठी वापरत असल्याचे उत्तर दिले. असा हा वाईट अनुभव आम्हाला आला. २०१५ साली माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे होते. तेव्हा या भल्या मोठ्या टोलच्या रांगेत ऍम्ब्युलन्सलाही जायला देत नव्हते. कारण काय तर पुढे असलेल्या गाड्यांकडून टोल वसूल करण्यात हे कर्मचारी दंग होते. हा सगळा अनुभव आल्यानंतर मी तर चार चाकी गाडी चालवायचे सोडूनच दिले. आता मी सर्व ठिकाणी बाइकनेच प्रवास करतो.
लेनची शिस्त पाळलीच पाहिजे – नम्रता गायकवाड, अभिनेत्री
मी एकदा पुण्याला जात असताना खंडाळा घाटात एका ट्रकला आग लागलेली पहिली. त्यामुळे तिथे इतका प्रचंड धूर निर्माण झाला होता. तेव्हा मला मुंबईतला एक प्रसंग आठवला, एकदा मी हायवेवर प्रवास करत असताना एक ट्रक बंद पडला होता. तरीही तो ट्रकचालक त्या ट्रकला प्रचंड रेस देण्याचा प्रयत्न करत होता. आधीच तापलेला तो ट्रक, अधिक रेस केल्यामुळे प्रचंड धूर सोडत होता. तो कोणत्याही क्षणी पेट घेईल असे दिसत होते. अशा या ट्रकचालकांना पॉलिसी खाक्या दाखवलाच पाहिजे. त्यांना दंड बसवून त्यांच्या मालकांनादेखील समज दिली गेली पाहिजे. एक्सप्रेस वेवर तर अत्यन्त बेफिकिरीने ट्रक चालवत असतात. लेनची शिस्त पाळत नाहीत. अशामुळेच अपघाताचे प्रमाण अधिक वाढत आहे. यावर आळा बसलाच पाहिजे.
वाहतुकीच्या गतीचा नियम कठोर केला पाहिजे – अशोक शिंदे, अभिनेता
आनंद अभ्यंकर हा माझा वर्गमित्र होता. त्याच असं अचानक तेही अपघातात जाणं मला फार मनाला लागलं. असच भक्ती बर्वे यांचंसुद्धा अपघातातच निधन झालं. सुबोधने जे म्हंटले आहे ते मला १०० टक्के पटले आहे. मी सुद्धा अनेकदा कुटुंबियांसोबत मुंबई – पुणे प्रवास करत असतो. त्यावेळी अनेक मोठ्या- महागड्या गाड्यांमधून फिरणारे १५० ते २०० किमीच्या गतीने जात असतात. ट्रकसाठी असलेली लेन ते न पळत असल्यामुळे मागून येणाऱ्या लहान गाडयांना पुढचे दिसत नाही आणि अपघात होतात. आपल्याकडे वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत, हि खेदाची गोष्ट आहे. मी हल्लीच थायलंड येथे गेलो होतो. तेथे एका कॅबमध्ये बसलो असताना त्या चालकाने स्टिअरिंग व्हील वरच्या आणि खालच्या बाजूने कापले होते. मी त्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘इथे जर का ३० किमीची मर्यादा असेल आणि ती ३१किमी जरी झाली तरी आमच्या खात्यातून पैसे कापले जातात. त्यामुळे स्पीड दिसावी म्हणून हे स्टीअरींग कापले आहे.’ आपल्याकडेही असे कडक कायदे केले गेलेच पाहिजेत. ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी आता नोटा बंद करण्याचा कडक कायदा केला तसाच हाही केला गेला पाहिजे. एकदा का नियम मोडणार्यांना कठोर शासन झाले किंवा मोठा दंड बसला तर लोकं सुधारतील. आणि हा नियम सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. मग तो कोणी मंत्री असो किंवा कोणी कलाकार वा खेळाडू. कोणालाही यातून वगळता कामा नये. ८० किमी प्रति तास हा नियम असलाच पाहिजे.
ड्रोन कॅमेर्यांचा वापर करून नियम मोडणाऱ्यांना पकडले पाहिजे – अंशुमन विचारे, अभिनेता
प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. आपल्याला खरंतर प्रत्येक गोष्ट सरकावर किंवा दुसऱ्या व्यक्तीवर ढकलण्याची सवयच झाली आहे. तर तसं न वागत सुरुवात स्वतः पासूनच केली गेली पाहिजे. एक्प्रेस वेवर अनेकदा मोठमोठे ट्रक लेन तोडून चालत असतात. अशांना टेक्नॉलॉजीचा वापर करून पकडून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आता तर ड्रोन कॅमेरे सर्वत्र बसवले गेलेत. याचा वापर करून नियम मोडणाऱ्या सर्वांवरच ताबडतोब कारवाई केल्यास इतरांनाही याचा वचक बसेल. त्यामुळे भविष्यात तरी अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.