मित्रांनो!, पवित्र पावन श्रावण मासाला व्रतांचा महिना म्हणून ओळखले जाते. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणातील व्रते म्हणजे केवळ वैयक्तिक मोक्ष साधनेचे मार्ग नाहीत. अतिशय तरलपणे काहीतरी शिकवण देणारी किंवा एकमेकांतील नाते संबंध जपणारी, ती वृद्धिंगत करणारी एक भावनिक; पण विशिष्ट नियमात जगणारी अमृत महिरप आहे ती.

आषाढ अमावास्येनंतर श्रावणास सुरुवात होते.श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे.

सोमवार, ०९ ऑगस्ट २०२१ ते सोमवार, ०६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत श्रावण मास आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळी व्रते आचरली जातात. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे मानले जाते.

श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे.

पहिला श्रावणी सोमवार – यंदाच्या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारीच होत असून, हे शुभ मानले जात आहे. श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार ९ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा केला जाईल. या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर तांदूळ शिवामूठ म्हणून वाहावे, असे सांगितले जाते.

दुसरा श्रावणी सोमवार – यंदाच्या वर्षी दुसरा श्रावणी सोमवार १६ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. या दिवशी महादेव शिवशंकरांची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून तीळ वाहावे, असे सांगितले जाते. दुसऱ्या श्रावणी सोमवारी दूर्वाष्टमी, दुर्गाष्टमी आणि पारशी नुतन वर्ष १३१९ प्रारंभ होत आहे. याच दिवशी सूर्याचा मघा नक्षत्रप्रवेश होत असून, वाहन गाढव आहे.

तिसरा श्रावणी सोमवार – यावर्षी तिसरा श्रावणी सोमवार २३ ऑगस्ट २०२१ रोजी असून, या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ म्हणून मूग वाहावे, असे सांगितले जाते. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याला वेगळे महत्त्व असल्याचे म्हटले जाते.

चौथा श्रावणी सोमवार – यंदाच्या वर्षी चौथा श्रावणी सोमवार ३० ऑगस्ट २०२१ रोजी आहे. या दिवशी महादेव शिवशंकरांची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून जव वाहावे, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे या दिवशी श्रीकृष्ण जयंती असून, संत ज्ञानेश्वर माऊलींचीही जयंती आहे. याच दिवशी सूर्याचा पूर्वा नक्षत्रप्रवेश होत असून, वाहन बेडूक आहे.

पाचवा श्रावणी सोमवार – साधारणपणे श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार येतात. यंदाचे विशेष म्हणजे यावर्षी पाचवा श्रावणी सोमवार येत आहे. ०६ सप्टेंबर २०२१ रोजी श्रावणी सोमवार असून, या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ म्हणून सातू वाहावे, असे सांगितले जाते. या दिवशी सोमवती अमावास्या असून, महाराष्ट्रात विशेषत्वाने साजरा केला जाणारा पोळा सण आहे.