शिक्षक – विद्यार्थ्यांची कथा रुपेरी पडद्यावर… मिलीमीटर झाला आता सेंटीमीटर… दुष्यंत वाघ साकारणार ‘शिष्यवृत्ती’ सिनेमात प्रमुख भूमिका…  शिक्षक – विद्यार्थ्यांचे अतूट नाते मांडणारा ‘शिष्यवृत्ती’ सिनेमा २१ फेब्रुवारीला येतोय ‘शिष्यवृत्ती’

शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचे एक वेगळेच अतूट नाते असते. आपल्याला समजायला लागल्यापासून ते जीवनाच्या शेवटपर्यंत हे नाते जुळलेले असते. शिक्षकांनी दिलेली चांगली शिकवण घेऊन आपण आपल्या आयुष्यात अनेक यशस्वी गोष्टी करत असतो. अशाच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारित एक सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याच नाव आहे ‘शिष्यवृत्ती’. साज एटरटेनमेंट प्रस्तुत आणि अखिल देसाई निर्मित आणि दिग्दर्शित ‘शिष्यवृत्ती’ हा सिनेमा येत्या २१ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयुष्यात प्रत्येक प्रगतीच्या वाटेवर आपल्याला शिक्षक हे असे गुरु भेटतात जे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देत असतात. त्यांनीच दर्शविलेल्या त्या मार्गावर चालत आपण यशाचे शिखर गाठत असतो. असेच काहीसे भावविश्व ‘शिष्यवृत्ती’ ह्या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या चित्रपटात ३ इडियट ह्या हिंदी चित्रपटात सेंटीमीटर ची भूमिका साकारणारा दुष्यंत वाघ हा प्रमुख कलाकार म्हणून आपल्या भेटीला येणार आहे. तसेच त्याच्यासोबत रुद्र ढोरे, अंशुमन विचारे, झील पाटील, प्रशांत नगरे, कमलेश सावंत, अनिकेत केळकर, उदय सबनीस आदी कलाकार आपल्याला दिसणार आहेत. ह्या चित्रपटाची निर्मिती अखिल देसाई ह्यांनी केली असून सोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी हि अखिल देसाई ह्यांनी पार पाडली आहे. ह्या चित्रपटातील गाणी प्रसंन्नजीत कोसंबी, जयदीप बागवडकर आणि मिथीला माळी ह्यांच्या सुरात सजली असून भरतसिंग ह्याचे संगीत ह्या चित्रपटाला लाभले आहे.

चित्रपटात दुष्यंत वाघ शिक्षक म्हणून तर रुद्र ढोरे हा विद्यार्थी म्हणून प्रमुख भूमिका साकारत आहे. सिनेमाचे पोस्टर आणि टीझर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. शिक्षक- विद्यार्थ्यातील अतूट नाते, त्याचे महत्त्व आणि त्या नात्याचा आदर करणारा ‘शिष्यवृत्ती’ सिनेमा २१ फेब्रुवारी २०२० रोजी चित्रपटगृहात येत आहे.