Dhondi Upcoming Marathi Movie

विनय आपटे यांचा अखेरचा चित्रपट ‘Dhondi’ “धोंडी” येतोय ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला !!

शेतकऱ्यांच्या जीवनाचा वेध घेणारा ‘Dhondi’ धोंडी हा चित्रपट ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात महत्त्वाचा विषय आणि उत्तम कलाकार पहायला मिळणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक विनय आपटे यांचा हा अखेरचा चित्रपट आहे.
आपल्या वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दहा वर्षांचा एक मुलगा काय काय करामती करतो, याची वेधक कथा धोंडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. निरागस बालमन, नातेसंबंध, बदलती नैसर्गिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांवरही हा चित्रपट भाष्य करतो. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेन्मेंटच्या शिवाजीराव जाधव, संतोष सुतार, निखिल नानगुडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. बोलपट एंटरटेन्मेंट आणि ओशन ९ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मोनिष उद्धव पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रोहित पंडित, मोनिष पवार यांनी चित्रपटाचं लेखन, दिनेश सटाणकर यांनी छायालेखन, किरण राज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विवेक चाबुकस्वार, सयाजी शिंदे, पूजा पवार, किशोर चौघुले, विनय आपटे, राघवेंद्र कडकोळ, सुहासिनी देशपांडे, उषा नाईक,अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे
‘Dhondi’ ‘धोंडी चित्रपट करण्यामागे दोन भावना आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांचा वेध घेणारे अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नाही हे बोलण्यापेक्षा शहरातील नागरिकांना शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शेतमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यांना
आत्महत्या करावी लागणार नाही. तसंच, हा चित्रपट पाहून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार सोडावा,’ असं दिग्दर्शक मोनिष पवार यांनी सांगितलं.