समीर आशा पाटील ‘यंटम’ दिग्दर्शित करत आहे.
‘चुकीला माफी नाही’ म्हणत ‘दगडी चाळ’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटचे अमोल ज्ञानेश्वर काळे ‘यंटम’ Yuntum या हटके चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘चौर्य’ या चित्रपटातून अवघ्या चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलेला समीर आशा पाटील ‘यंटम’ Yuntum दिग्दर्शित करत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाचे लेखक दिग्दर्शक नव्या धाटणीचे विषय सादर करत आहेत. त्या बरोबरच नव्या दमाचे निर्माते वेगळ्या विषयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात आहेत. निर्माते अमोल, ज्ञानेश्वर काळे आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील ही त्याचीच दोन उदाहरणं.
अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी ‘दगडी चाळ’ या वेगळ्या चित्रपटातून यश मिळवलं तर समीरनं चौर्य हा धाडसी विषय हाताळला. हे दोघं ‘यंटम’ Yuntum च्या निमित्तानं एकत्र येत असल्यानं प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळं पहायला मिळणार आहे. अमोल काळे यांच्यासह संजय अभिमान पवार या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. ‘यंटम’ या चित्रपटात संगीत हा खूप महत्त्वाचा घटक आहे.
‘यंटम’ हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. आताच या चित्रपटाविषयी सर्व सांगणं योग्य ठरणार नाही. वेळोवेळी सर्व तपशील जाहीर केले जातील.
मात्र, या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच वेगळं काहीतरी पहायला मिळेल,’ असं दिग्दर्शक समीर आशा पाटीलनं सांगितलं.
“दगडी चाळ” या माझ्या अँकशनपटानंतर खरंतर मी एका वेगळ्या कथानकाच्या शोधात होतो. त्यावेळी माझी भेट समीरशी झाली आणि त्याने मला ‘यंटम’ ची कथा ऐकवली त्याचवेळी मला ती भावली आणि मी लगेच होकार दिला.
आता नेमकं “यंटम” म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले.