रितेश देशमुख बनला मराठमोळा ‘सांताक्लॉज’
ऑक्टोबरमध्ये जसा दिवाळीचा माहोल सुरू होतो, तसा डिसेंबर महिना म्हटला की सर्वाना नवीन वर्षांचे आणि नाताळचे वेध लागतात, या नाताळ सणाचे प्रमुख आकर्षण असणारा ‘सांताक्लॉज’ देखील याच महिन्यात आपल्याला जागोजागी भेटवस्तूंची लयलूट करताना दिसून येतो. आपल्या महाराष्ट्रातही असाच एक मराठमोळा सांताक्लॉज आहे,
जो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विकता का उत्तर’ या शोच्या माध्यमातून दर शुक्रवार ते रविवार प्रेक्षकांना भरघोस आनंद देण्यासाठी येतो…आणि तो म्हणजे सगळ्यांचा लाडका रितेश देशमुख! हा मराठमोळा सांताक्लॉज ‘विकता का उत्तर’ या कार्यक्रमाचे केवळ होस्ट करत नाही, तर तो स्पर्धकांच्या सुख-दुखाचा वाटाड्यादेखील बनतो.
कधी भावाच्या, कधी मुलाच्या तर कधी मित्राच्या नात्याने भावूक झालेल्या स्पर्धकांचे तो सांत्वन करतो. रितेशने अनेक गरजू लोकांना या शोमार्फत मदत देखील केली आहे. सातारा, वाई येथे राहत असलेल्या वर्षा गाढवे या सामान्य महिलेला रितेशने आपल्याकडून स्कुटी भेट केली होती. तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या नाशिकच्या दिपाली चव्हाण या तरुणीच्या शिक्षणाचा खर्च देखील रितेशने उचलला आहे.
तसेच अंबरनाथ येथे सध्या राहत असलेल्या विजय थोरात यांच्या भाच्याला भेटण्यासाठी खुद्द त्यांच्या घरी जाण्याचे आश्वासन देखील रितेशने विजय यांना दिले, याच शोमध्ये रितेशने विजय यांना उचलूनसुद्धा घेतले होते. काही महिला स्पर्धकांच्या इच्छेखातर रितेश त्यांच्यासोबत कार्यक्रमाच्या सेटवर थिरकतो देखील! नुकत्याच झालेल्या एका भागात रितेशने ‘नटसम्राट’ची भूमिका करणा-या सुहास नार्वेकरांच्या अॅक्टला मनापासून दाददेखील दिली होती. रितेशच्या या दिलदार वृत्तीची प्रचीती या शोमध्ये भाग घेणा-या प्रत्येकाला येत आहे.
‘विकता का उत्तर’ या कथाबाह्य कार्यक्रमात खुमासदार सूत्रसंचालन करून स्पर्धकांना आपलेस करणा-या रितेशला खऱ्या अर्थाने वास्तविक जीवनातील ‘सांताक्लॉज’असेच म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे, या शोमध्ये आलेल्या प्रत्येक स्पर्धकाला रितेश आपल्याकडून विशेष भेटवस्तू देताना दिसतो आहे.
शिवाय या खेळात अपयशी झालेल्या स्पर्धकांना देखील काहीतरी भेटवस्तू देण्याचा नियम रितेशचा असल्यामुळे कोणताही स्पर्धक ज्या शोमधून आजतागायत रिक्त हस्ते किंवा नाराज होऊन गेलेला दिसून येत नाही. सामान्य व्यक्तींच्या भावभावनांचा वेध घेण्याची किमया या मराठमोळ्या सांताक्लॉजला चांगलीच जमली असल्याचे दिसून येते.
सांताक्लॉज नेहमीच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यानांच आपल्या भल्या मोठ्या गोणीतून आणलेले सुख वाटत असतो, ‘विकता का उत्तर’ मध्येदेखील याच सुखाची उधळण आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे केवळ ‘ख्रिसमस’लाच नव्हे तर त्यानंतरही रितेश या शो मधल्या स्पर्धकांना भरभरून भेटवस्तू देताना दिसणार आहे.