आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सैराट’मधून याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा विचार आहे. सामाजिक न्याय विभाग यासंदर्भात पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक लाभ देण्याचा विचार सामाजिक न्याय विभाग करत आहे. राज्यभर अभियान चालवलं जाणार असून आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना विवाहाची ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा इच्छुक जोडप्यांचा सामुहिक विवाह करण्याचाही विचार असून अद्याप अंतिम निर्णय नाही झाला नाही.
सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. आता रिंकू राजगुरु आणि तिचे पालक राज्य सरकारचा हा प्रस्ताव स्वीकारतात की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे मात्र आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु अल्पवयीन असताना तिला आंतरजातीय विवाह योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवणं कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे.