कमाल राशिद खान उर्फ केआरके आणि सलमान खान यांच्यात आजकाल मोठ्ठा वाद-प्रतिवाद सुरू आहे. हे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे. केआरके म्हणतोय की, सलमान त्याच्यावर रागावला आहे कारण त्याने ‘राधे’ या सलमानच्या बहुचर्चित चित्रपटाचा निगेटिव्ह रीव्ह्यू दिला आहे तर, त्याचवेळी सलमानच्या कायदेशीर टीमचे म्हणणे आहे की केआरकेने भ्रष्टाचाराचा आरोप करून सलमानची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोण योग्य आणि कोण चूक हे अर्थातच न्यायालय ठरवेल. जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालू आहे, तोपर्यंत केआरकेला सलमानबद्दल बोलण्याची परवानगी नाही. पण केआरके काही मानण्याच्या मानस्थितीतच नाही. त्याने सलमानचे नाव न घेता सोशल मीडियावर ट्वीट करणे सुरूच ठेवले आहे. नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये केआरकेचा दावा आहे की, ‘राधे’ रिलीज केलेल्या झी स्टुडिओला मी लिहिलेल्या “राधे”च्या निगेटिव्ह रीव्ह्यूमुळे सुमारे ९५ कोटींचे नुकसान झाले आहे.
“मीडिया रिपोर्टनुसार “झी”ला त्याच्या शेवटच्या मोठ्या रिलीजमुळे ९५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. याचे सर्व श्रेय जगातील पहिल्या क्रमांकाच्या समीक्षकाला जाते. सर्वांना खूप खूप प्रेम.” याचाच अर्थ केआरके स्वत:ला जगातील प्रथम क्रमांकाचा फिल्म क्रिटिक मानतो. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये तो, ‘बॉलिवूडचा गुंडा भाई’ असा उल्लेख करत राहतो.
हे नाव कोणासाठी वापरले जाते हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यानंतर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहिलेय की, “या बॉलिवूडच्या गुंडा भाईला वाटते की इतके सर्वजण त्याचे फॅन्स आहेत. हा किती मोठ्ठा विनोद आहे! अबे!, तुझे चाहते आता या पृथ्वीवर तर नाहीतच. कुठेतरी तिकडे मंगळावर असतील, तर आता तू स्वतःचा चित्रपट थेट मंगळावरच प्रदर्शित कर.”
केवळ सलमानच नाही तर केआरके मिका सिंग सोबत देखील भांडत आहे. सलमानच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या मिकाला केआरकेने त्यांच्या अनेक ट्विटमध्ये फटकारलेय. यामुळे चिडलेल्या मिकाने केआरकेवर डिस्क ट्रॅकही केलाय. ‘राधे – युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ झी ने आणखी काही चित्रपटांसह २३० कोटींमध्ये खरेदी केला. तेव्हाची योजना अशी होती की हा चित्रपट चित्रपटगृह तसेच Pay Per View ऑनलाईन पे वरही प्रदर्शित होईल. झी प्लेक्सवर ‘राधे’ पाहण्यासाठी Per View रु. २५०/- रुपये खर्च करावे लागणार होते.
पण ‘राधे’ रिलीज होण्यापूर्वीच कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभर मोठीच आरोग्य समस्या निर्माण करून लॉकडाऊन करण्यास सुरवात केली. थिएटर बंद होती. यामुळे झी ला फक्त ‘राधे’ ऑनलाईनच रिलीज करण्याचा पर्याय शिल्लक राहिला. पहिल्या दिवशी ‘राधे’ ४२ लाख लोकांनी पाहिल्याचं सांगितलं गेलं. परंतु याचा अर्थ असा नाही की ४२ लाख लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकी २४९/- रुपये खर्च केलेत. एका कुटुंबात बरेच लोक असतात. आणि बऱ्याच अंशी हे शक्य आहे की, त्या सर्व लोकांनी हा चित्रपट एकत्रितपणे, एकाच खरेदीमध्ये पाहिला असेल.
तसे पाहायला गेले तर ‘राधे’ हा एक मोठा चित्रपट आहे, म्हणून त्याचा टीव्ही प्रीमियरही संपूर्ण जोशात होईल. यामुळे झी ला आणखी सुमारे ५०-६० कोटी रुपये नक्कीच मिळतील. “मिंट” मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार मात्र ‘राधे’ मुळे झी प्रीमियरचे किमान ७० ते ८० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.