लक्ष्मण कागणे हे नाव मराठी चित्रपटसृष्टीत तसं परिचयाचं. ‘हलाल’ या वैचारिक चित्रपटाच्या निर्मितीने लक्ष्मण कागणे हे नाव प्रकाशात आलं पण त्यांची खरी ओळख इथे थांबत नाही. सातत्याने समाजाप्रती निष्ठेने कार्यरत असणारे लक्ष्मण कागणे यांची अयोध्या ही संस्था तसेच हॉस्पिटल, कॉलेज गेली २८ वर्षे समाजोपयोगी कार्य करत आहे आणि आरोग्य विभाग, अपंग कल्याण भारत सरकार करिता मुख्यतः झटणाऱ्या लक्ष्मण कागणेंनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तो केवळ चित्रपट माध्यमातून जनजागृती करण्याच्या उद्देशाने. ‘हलाल’ नंतर लक्ष्मण कागणे यांनी ‘लेथ जोशी’ आणि ‘परफ्युम’ सारखे प्रेक्षकांना विचार करायला भाग पडणारे हटके विषय प्रस्तुत केले होते पण आता थोडा हलका-फुलका चित्रपट ते रसिकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लक्ष्मण कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील एकत्र येत आहेत.
लक्ष्मण कागणेंच्या सेवेप्रती भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने नावाजले असून त्यांच्या अयोध्या संस्थेचे कौतुक ही केले. समाजसेवेसाठी वाहून घेतलेल्या लक्ष्मण कागणेंना चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करण्याबाबत विचारले असता, ”चित्रपट हे समाज प्रतिबिंबाचा आरसा असून त्याद्वारे जनजागृती प्रभावीपणे होऊ शकते असं मला वाटतं. काही विषयांना चित्र माध्यमातून वाचा फोडणं ही काळाची गरज आहे. खूप अशा गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. जे हे चित्रपट एकाचवेळी अनेकांपर्यंत ३ तासांत पोहचवू शकतात म्हणून मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.” असं सांगतात. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘वाजवुया बँड बाजा’ हा त्यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ह्या चित्रपटाची कथा विनोदी धाटणीची आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने दोन राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी म्हणजेच निर्माते लक्ष्मण कागणे आणि दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील एकत्र येत पुन्हा एकदा प्रेक्षकांना विचार करायला लावणार आहेत की मनमुराद हसवायला तयार आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित ‘वाजवुया बँड बाजा’ हा चित्रपट लग्नोत्सुकांवर आधारित आहे. संदीप नाईक लिखित ‘वाजवुया बँड बाजा’ची कथा आहे एक नाही दोन नाही तीन-तीन लग्नोत्सुक जोडप्यांची. ही तीन जोडपी कोण आहेत हे अजून गुलदस्त्यात असून मराठी मनोरंजनक्षेत्रातले अनेक दिग्ग्ज या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची पटकथा-संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहे तर छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असणार आहे. संगीत-विजय गटलेवार, गायक-आदर्श शिंदे, संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे.