मित्रांनो!, नाना पाटेकर… हे नुसते नाव जरी घेतले तरी सिनेनाट्यसृष्टीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या उरात एक आदरयुक्त अभिमान भरुन येतो. आमचा नाना, आपला माणूस नाना. भारदस्त जरब बसविणारा आवाज आणि आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना पाटेकर यांनी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
नाना पाटेकर यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आजही नानांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या आयुष्यातल्या खास घटनांचे किस्सेही चाहत्यांमध्ये रंगत असतात. नुकताच त्यांचा असाच एक अफलातून किस्सा समोर आला आहे. डॉ वि. भा. देशपांडे यांनी नाट्यमित्रमंडळमध्ये नाना यांचा हा खास किस्सा सांगितला होता. तोच किस्सा खास आमच्या वाचक मित्रांसाठी…
नाना यांचे ‘पुरुष’ नाटक प्रचंड गाजले होते. मराठी प्रमाणे हिंदीतही हे नाटक गाजले. त्यामुळे मराठीप्रमाणे हिंदीमध्येही त्यांचा चाहता वर्ग निर्माण होत गेला. विशेष म्हणजे अनेक चाहते फक्त नाना यांची एक झलक पाहाता यावी यासाठीच गर्दी करायचे. त्यामुळे नाटक सुरु होण्यापूर्वी नाना एक सांगायचे की, ”जे मला बघण्यासाठी आले आहेत. त्यांनी मला पाहा आणि जे नाटक पाहायला आलेत फक्त त्यांनीच नाट्यगृहात थांबा.”
बघता बघता नाना प्रचंड लोकप्रिय होत गेले. हिंदीतही त्यांना अनेक ऑफर्स मिळू लागल्या. नाना अभिनय क्षेत्रात अपघातानेच आले हे सगळ्यांनाच माहिती आहे. नाना अभिनय क्षेत्रात आले ते ‘गड जेजुरी’ चित्रपटाच्या निमित्ताने. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक श्री. राम कदम यांनी तो सिनेमा बनवला होता. पण हा सिनेमा काही कारणामुळे प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे नाना यांच्या या सिनेमाविषयी फारसे कोणाला माहिती नाही.
सिनेमाचं शूटिंगही जेजुरीमध्ये झाले होते. सिनेमात टांग्यावाल्याची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. भूमिका परफेक्ट व्हावी म्हणून महिनाभर नाना यांनी टांगा चालवण्याचा सराव केला होता. त्यासाठी एक टांगाच खास त्यांनी बुक केला होता. रेल्वेस्टेशन, बस स्टँड, देवळात कोणाला जायचे असेल तर लोकांची ने-आण करायचे.
टांगेवाल्याप्रमाणे नाना वागायचे, बोलायचे, गिऱ्हाईकांकडून भाडेही आकारायचे, त्यामुळे कोणालाच त्यांना ओळखणेही शक्य नव्हतं. ज्यासाठी इतकी मेहनत नाना यांनी घेतली होती तो चित्रपट तर प्रदर्शित झाला नाही. पण यानंतर दुसरा चित्रपट त्यांनी केला तो मात्र सुपरहिट ठरला. तो चित्रपट होता ‘माफीचा साक्षीदार. ‘यानंतर नाना यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही नाना यांची जादू रसिक प्रेक्षकांवर तशीच कायम आहे.