‘कलर्स’वर सुरांचे रंग मधुरा संग
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या गाजत असलेल्या शोमध्ये वेगवेगळ्या शैलीत गावून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मधुरा कुंभार आता मधुर आवाजात गवळण सादर करायला सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना येत्या सोमवार ते बुधवार कलर्स मराठीवर मधुराच्या आवाजात लोकसंगीताचा आनंद घेता येणार आहे.
आधी सैराटच गावरान शैलीतलं गाण, त्यानंतर वेस्टर्न गाण आणि आता तिसऱ्या भागात लोकगीत. भारताची गानकोकीळा लता मंगेशकर व आशा भोसले या महान गायिकांना आपले आदर्श मानून मधुराने गाण्यांच्या सर्व प्रकारांना न्याय दिला आहे. सर्व प्रकारांमध्ये उत्कृष्टपणे गाणं हे मधुराच कौशल्य असून त्याचा प्रत्यय सूर नवा ध्यास नवाच्या गेल्या दोन भागांमध्ये प्रेक्षकांना आलेलाच आहे. प्रेक्षकांना आता ओढ आहे ती तिसऱ्या भागाची.

मुंबई विद्यापीठातून हिंदुस्थानी क्लासिकल म्युझीकमध्ये सुवर्ण पदक पटकावून आपल्या गायन प्रतिभेचा, आपल्यातील प्रतिभेचा मधुराने आधीच प्रत्यय दिला. गुरू पंडित डॉ. राम देशपांडे व उत्तराताई केळकर यांच्या मार्गदर्शनाने, आशिर्वादाने व आपल्या सुरेल शैलीने मधुरा एक उत्कृष्ट गायिका म्हणून नावारूपाला आली.

झी मराठी वरील आयडीआ सारेगामापा, झी टीव्हीवरील हिरो होंडा सिंगींग स्टार या कार्यक्रमात गावून तीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्यातील कौशल्यामुळे झी टीव्हीवरील लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाच्या ऑडीशनसाठी जज् म्हणून तिला जबाबदारी मिळाली.

चित्रपट, नाटक, मालिकांची शिर्षक गीत
केवळ रिॲलीटी शो पूरतं मर्यादीत न राहता. मधुरातील प्रतिभा, तिचा आवाज व गाण पाहून तिला अनेक चित्रपट, नाटक व मालिकांची शिर्षक गीतं गाण्याची संधी मिळाली. बालगंधर्व, अजिंठा, वजनदार, संदूक, धनगरवाडा यांसारख्या गाजलेल्या व संगितमय चित्रपटात गावून मधुराने आपल्या आवाजाला एका वेगळ्या उंचिवर पोहचविले. केवळ चित्रपटच नव्हे तर सोबत संगत, गावात होईल शोभा, किमयागार आदी नाटकांची शिर्षक गीत तसेच झी टीव्हीवरील गाजलेली मालिका होणार सून मी या घरची व स्टार प्रवाह वरील आम्ही दोघे राजा रानी या मालिकांची शिर्षक गीतंही मधुराने आपल्या आवाजात गाजविली.


सुवर्ण पदक पटकाविणे हे मोठे यश, मात्र ही यशाची केवळ पहिली पायरी मानून मधुराने वाटचाल केली. आपल्या आवाजावर असलेला विश्वास, प्रामाणिकपणा वेगवेगळ्या शैलीत गाणं यामुळे मधुरा आज एक उत्कृष्ट गायिका म्हणून सर्वांना परिचित आहे. काही गायक गायिकांनी केवळ अमुक एका शैलीतच गावून स्वत:च्या आवाजाला मर्यादीत करून ठेवलंय. मधुराने मात्र गावरान शैली असो वा वेस्टर्न, नाट्यगीत असो वा चित्रपटगीत किंवा लोकगीत सर्व प्रकारांना आपल्या सुरेल आवाजाने न्याय दिला आहे.

सेलिब्रेटी सिंगर अर्थात प्रसिद्ध गायक गायिकांचा सहभाग असलेला कलर्स मराठीवरील सुर नवा ध्यास नवा या नव्या शोमध्ये मधुराने दोन भागात गाण सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलच आहे. आता तिसऱ्या भागात ती गवळण गाणार आहे. प्रेक्षकांना ही एक पर्वणी ठरणार आहे. तिच्या या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.. मधुराच्या गाण्यांचा आनंद घेण्यासाठी बघा दर सोमवार ते बुधवार कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा.
गाण्यांच्या प्रवासात
मधुराचा आता अंदाज नवा