मराठी सिल्व्हर-स्क्रीनवरचा ‘राजन’ लवकरच…
रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस यांची निर्मिती असलेला ‘Rajan’ ‘राजन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित या सिनेमाच्या ‘Rajan’ ‘राजन’ ह्या शीर्षकामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. मुंबईत होत असलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे लवकरच लोकांना समजणार आहे. असे असले तरी, या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा ९० च्या दशकात मुंबईत राज्य करणारा ‘छोटा राजन’ वर आधारित असल्याचे बोलले जात आहे. तुर्तास, याबाबत कोणतीच अधिकृत बातमी समोर आली नसली तरी, या सिनेमाच्या टिजर पोस्टरचा आवाज सोशल साईटवर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाच्या पहिल्या टिजर पोस्टरवर पोलीस कोठडीचे चित्र दिसत असून, नुकतेच प्रदर्शित झालेल्या दुसया पोस्टरवर ‘वॉन्टेड’ या अद्याक्षराच्या खाली सिहांची प्रतिकृती दिसत असल्यामुळे, हा सिनेमा तत्कालीन मुंबईतील गुंडगिरीवर भाष्य करणारा आहे, असा अंदाज येतो.
या सिनेमाबद्दल सांगताना दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी, ‘राजन’ हा सिनेमा वास्तविक जीवनावर बेतला असल्याचे सांगितले. ‘प्रेक्षकांनी हा सिनेमा एक मनोरंजनाचा भाग म्हणून पहावा. १९८३ ते १९९३ सालातली मुंबई आणि त्यावेळचा गँगवाॅर आजच्या पिढीलासुद्धा कळले पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा असून, त्यावेळी मी जे काही पाहिले आणि बातम्यातून जाणले, तेच मी माझ्या लेखणीतून मोठ्या पडद्यावर सादर केले आहे’ असे ते स्पष्ट करतात. तसेच, हा ‘Rajan’ ‘राजन’ हा सिनेमा कोणाच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित नसून, त्याकाळच्या परीस्थीला प्रेरित होऊन बनवलेला सिनेमा आहे, ज्यात सिनेमाचा नायक हा ‘राजन’ आहे, असे देखील ते पुढे स्पष्टीकरण देतात.
‘Rajan’ ‘राजन’ या सिनेमाचे सुरेखा पाटील, दिप्ती बनसोडे आणि वामन पाटील यांनी निर्मिती केली असून, तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या सिनेमातील स्टारकास्टबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली असून, लवकरच मराठीच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा हा ‘राजन’ नेमका कोण, हे सर्वांसमोर येणार आहे. आगामी ‘राजन’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित होत असलेल्या मराठी सिनेमांच्या यादीत एक नवा थरार घेऊन येईल, हे नक्की!