मित्रांनो! ह भ प. म्हटलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर, डोक्यात पगडी घातलेले साठी उलटलेले , धोतर नेसलेले बुवा येतात. मात्र गेल्या काही गेल्या वर्षात हे चित्र पालटलेले दिसत आहे. त्याला कारणे देखील आहेत. परंपरागत व्यवसाय म्हणजे धार्मिक विधींचे पुरोहित, गुरूजी यासाठी अभिजन वर्गात मनुष्यबळ नाही. वारकरी समुदायातून बहुजन समाजात कीर्तनकार घडवण्याची परंपरा गेल्या काही वर्षात चांगली मूळ धरू लागली आहे.

बरेचसे कीर्तनकार आता नावारूपाला आले आहेत. बाबामहाराज सातारकर, आंधळे महाराज किंवा अजून असे कितीतरी असतील. हे सर्व महाराज गंभीर प्रकृतीचे होते. थोडेफार हास्याचे शिडकावे करत प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे यांचे कौशल्य त्यांना लोकप्रियता मिळवून देतात. इंदूरीकर महाराजांनी मात्र खळखळून हसवणारी कीर्तनं सुरू केली आणि बघता बघता आख्ख्या महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाने धुमाकूळ घातलाय.

तरीपण स्त्रियांनी मात्र आजवर या क्षेत्रात म्हणावे असे नाव कमावले नव्हते. अभिजन वर्गातल्या तुरळक अशा महिला येत राहील्या. बहुजन समाजात मात्र महिला या क्षेत्रात येत नव्हत्या. कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदा रूढ अर्थाने कीर्तनकार असलेली महिला मिळाली. अगदी शाळेत असल्यापासून त्या कीर्तन करतात. त्यांना कीर्तनासाठी वारकरी संघाकडून पुरस्कार मिळाले आहेत. ते ही लहान वयातच. शिवलीलाताई पाटील या इंदूरीकर महाराज यांच्याप्रमाणे खळखळून हसवतात.

त्यांचा असा चाहता वर्ग आहे. एक महिला जेव्हां सांगते तेव्हां महिलांना ते पटते. त्या कीर्तन करताना प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांची उत्तरं चिमटे काढत देतात. साधे साधे तत्वज्ञान सांगतात. खेड्यापाड्यात जे तत्त्वज्ञान प्रिय आहे तेच त्या सांगतात. त्यावर शिक्कामोर्तब करतात. संसारी माणसाची कर्तव्ये काय हे तर कुणालाही पटेल. लसावि काढायचा झाल्यास वादग्रस्त उपदेश वगळून ८०% भाग हा सामाजिक वर्तनाबद्दलचा असतो. नव-याने दारू पिऊ नये, मुलाबाळांकडे लक्ष द्यावं, मुलांनीही गुटखा – दारू – तंबाखू खाऊ नये, आईवडीलांना मान द्यावा, कामधंदा करावा, मुलीही अशा मुलांना नाकारू शकतात, त्यांना तो हक्क आहे हे त्या हसवून हसवून सांगतात.

शिवलीला पाटील या बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉसचा यंदाचा तिसरा सीजन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. सायंकाळी ७ वाजल्यापासून कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ज्यांची कीर्तनं प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकार ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील देखील यंदाच्या सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे. तरुण कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटील या खूप प्रसिद्ध आहे.

त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला पाटील यांची कीर्तन पाहिली जातात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या समाजप्रबोधन करत आहेत. कीर्तन या पुरुषप्रधान क्षेत्रात शिवलीला पाटील यांचं नाव प्रसिद्ध आहे. अनोख्या विनोदी शैलीत त्या कीर्तन करतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाची सोशल मीडियावर खूप चर्चा होते.

शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. घरातूनच त्यांना कीर्तनाचं बाळकडू मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागल्या. त्यानंतर त्यांनी अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. तिनं एक हजार कीर्तन केली आहेत. एक महिला म्हणून अशा क्षेत्रात पाय रोवून उभ्या राहणा-या आणि अनेक मुलींना या वेगळ्या वाटेवर येण्यास प्रवृत्त करणा-या ताईंचे अभिनंदन देखील करावेसे वाटते. त्या या क्षेत्रात येऊ शकतात आणि ते स्विकारले जाते हा सकारात्मक विचार आहे. पण त्यांचे काही विचार हा नक्कीच चर्चेचा विषय राहील