मित्रांनो! जसे की आपण सर्वजण जाणतोच की, बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवार ७ जुलै २०२१ रोजी सकाळी साडेसहा वाजता दुःखद निधन झाले. दिलीपकुमार हे बऱ्याच दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने ग्रस्त होते. याच महिन्यात या आधी दोनदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर बुधवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दिलीपकुमार यांनी शेवटचा श्वास घेतला आणि दिलीपकुमार यांच्याबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीचे एक सुवर्णमयी महापर्व अस्त झाले.

दिलीपकुमार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या व्यावसायिक जीवनाशी आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील बहुतेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे दोन लग्नं करूनही त्यांना संतानसुखाची प्राप्ती झाली नव्हती. आयुष्याच्या शेवटपर्यंत ही गोष्ट त्यांच्या मनात सलत राहिली की, माझ्या वंशाला कुणी हक्काचा वारस नाहीय.

दिलीप कुमार आणि सायरा बानो या जोडीला बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट जोडयांपैकी एक मानले जाते. तसे दिलीपकुमार यांच्या आयुष्यात एक नव्हे तर दोन विवाह झाले होते, त्यापैकी त्यांनी सायरा बानोशी लग्न केले वर्ष 1966 मध्ये तर दिलीप कुमार यांचे दुसरे लग्न अस्मा रेहमान बरोबर झाले होते सन 1981 मध्ये. ती दिलीप कुमारची दुसरी पत्नी होती.

दिलीपकुमारचे अस्मा रेहमानसोबतचे लग्न फक्त 2च वर्ष टिकले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि दिलीप कुमार पुन्हा पत्नी सायरा बानोकडे परत गेले. दिलीपकुमार यांनी त्यांच्या ऑटो बायोग्राफी ‘द सबस्टन्स अँड दी शाडो’ मध्ये आपल्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस आणली आहेत आणि याच चरित्रात दिलीप कुमारने आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दलही सांगितले होते.

दिलीपकुमार साहेबांनी त्यांच्या ऑटो बायोग्राफीमध्ये लिहिले आहे की 1972 मध्ये त्यांची पत्नी सायरा बानो पहिल्यांदा आई होणार होती. तेंव्हा ती 8 महिन्यांची गरोदर सुद्धा होती. दिलीपकुमार आणि सायरबानो दोघेही बऱ्याच वर्षांनी प्रचंड खुश होते. सर्वकाही ठीक चालले दैवाच्या मनांत मात्र काहीतरी वेगळेच होते. आणि शेवटी जे विधिलिखित होते तेच झाले.

गरोदरपणाच्या 8 व्या महिन्यात , सायरा बानोला उच्च रक्तदाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. अशा नाजूक आणि अवघडलेल्या परिस्थितीत डॉक्टरांना शस्त्रक्रिया करणे मुळीच शक्य नव्हते. यामुळे शेवटी नको तेच घडले. सायरा बानोच्या गर्भाशयातच मुलाचा मृत्यू झाला. सायरबानो वाचली परंतु या जीवघेण्या प्रसंगानंतर सायरा बानो कधीच आई होऊ शकली नाही.

दिलीप कुमार यांचे स्वत:चे मूल असावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी दिलीपकुमार यांनी 1981 मध्ये अस्मा रहमान बरोबर लग्न केले. परंतु प्रेम मात्र त्यांनी फक्त सायराबानोवरच केले. दिलीपकुमार यांना असे वाटले की अस्माशी लग्न केल्यानंतर त्यांचे वडील होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. पण त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकलेच नाही. अस्मा आणि दिलीपकुमारचे लग्न फक्त 2 वर्षातच मोडले.

त्यानंतर दिलीपकुमार सायरा बानोबरोबर राहिले ते आयुष्याच्या अखेरपर्यंत. दिलीपकुमारने आयुष्यभर वडील न होण्याचा आणि सायराबानो यांच्याबरोबरच आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आणि तो शेवटपर्यंत पाळला सुद्धा. सायरा बानोनेही पत्नी होण्याचे कर्तव्य पुरेपूर पार पाडले आणि त्यांची खूप काळजीही घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत सायरा बानो दिलीपकुमारची साथ सोडली नाही.