प्रेक्षकांची लाडकी वाहिनी असलेल्या ‘झी युवा’वर नुकताच ‘युवा डान्सिंग क्वीन’ हा नवा कार्यक्रम सुरु झालेला आहे. चाहत्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असं काहीतरी घेऊन येण्याची परंपरा वाहिनीने या स्पर्धेतून सुद्धा जपलेली आहे. १४ नर्तिकांच्या दिलखेचक अदा, अद्वैत दादरकरचं अप्रतिम सूत्रसंचालन आणि सोनाली कुलकर्णी व मयूर वैद्य यांचे उत्कृष्ट परीक्षण यांच्या जोरावर या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली आहे. सेलिब्रिटी नृत्यांगना आणि त्यांच्या डान्सचा जलवा हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य आहे. नाविन्यपूर्ण गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची परंपरा वाहिनीने या कार्यक्रमातून सुद्धा कायम राखलेली आहे. याचाच एक भाग म्हणून, धनश्री काडगावकरने अभिनेत्री रेखाजींच्या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री काडगावकर घराघरांत पोचली आहे. एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केल्यानंतर, आपली नृत्यकला दाखवण्याची संधी ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या माध्यमातून तिला मिळालेली आहे. या संधीचं तिने पूरेपूर सोनं केलेलं असल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या उत्कृष्ट नृत्याच्या जोरावर तिने प्रेक्षक आणि परीक्षकांना प्रभावित केलेले आहे. स्पर्धेतील मागच्या आठवड्यात, बॉलीवूड अभिनेत्री रेखाजी, यांच्या ‘उमराव जान’ या सिनेमातील ‘इन आँखो की मस्ती मैं’ या गाण्यावर धनश्रीने आपले बहारदार नृत्य सादर केले. तिच्या रमणीय अदांनी साऱ्यांच्या मनात छाप पाडली. परीक्षक सुद्धा खूपच खुश झालेले पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या अभिनेत्रीच्या गाण्यावर सादरीकरण केल्यानंतर लूक्स आणि परफॉर्मन्सची झालेली तारीफ ऐकताना धनश्री आनंदी झालेली पाहायला मिळाली.

याविषयी बोलताना धनश्री म्हणाली; “मी रेखाजींची खूप मोठी फॅन आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या माध्यमातून, इतक्या मोठ्या मंचावर त्यांच्या गाण्यावर नृत्यसादरीकरण करण्याची संधी मला मिळाली, याचा मला फार आनंद झाला. मी स्वतः भारतनाट्यम शिकेलेली आहे. पण, या गाण्यावरील कोरिओग्राफी पूर्णपणे कथ्थक या नृत्यप्रकारावर अवलंबून आहे. हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते. रेखाजींची बरोबरी करणे अर्थातच कुणालाही शक्य होणार नाही. मी माझ्यापरीने सर्वोत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. परीक्षकांना हे नृत्य आवडले याचा खूपच आनंद झाला आहे. माझ्या लूक्सवर मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते. माझ्या या यशात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. परीक्षकांना माझा परफॉर्मन्स आवडलेला असल्याने, प्रेक्षकांना सुद्धा तो आवडेल याची मला खात्री आहे.”